Maharashtra Kesari: चंद्रहार पाटीलला पराभवाचा धक्का तर अभिजित कटके, सागर बिराजदारची विजयी सलामी

पुणे : समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व  मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशी अनेक रंगतदार कुस्त्या झाल्या.

 

यात महाराष्ट्र केसरी गटात अनेक मातब्बर मल्लांना पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. यात सर्वाधिक धक्कादायक निकाल होता, तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचा. हिंगोलीच्या गणेश जगतापने त्याला चितपट केले. अभिजित कटके, सागर बिराजदार यांनी विजयी सलामी दिली.
*चंद्रहार चितपट
भूगाव येथील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत गादी विभागात सांगलीच्या चंद्रहार पाटीलची पहिल्या फेरीत हिंगोलीच्या गणेश जगतापशी लढत होती. या लढतीत चंद्रहार पाटीलचे पारडे जड मानले जात होते.
त्यामुळे चंद्रहार पाटीलला या स्पधेर्तील प्रबळ दावेदारांपैकी एक मानले जात होते. चंद्रहारची कुस्ती पाहण्यासाठी मैदानावर कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. चंद्रहारची गणेश जगतापसोबत लढत होती.  गणेश जगतापने पहिल्याच फेरीत दुहेरी पट काढला. यानंतर चंद्रहार पाटीलने फ्रंट साल्तो डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. यानंतर अवघ्या दीड मिनिटांत गणेशने चंद्रहारला चितपट केले.
*शिवराजला दुखापत
पुणे शहरच्या अभिजितची सलामीची लढत पुणे जिल्ह्याच्या शिवराज राक्षेविरुद्ध होती. दुखापतीमुळे शिवराजने ही लढत सोडली. त्या वेळी अभिजित ७-२ने आघाडीवर होता.

 

अभिजित कटके याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली आणि ३ गुणांची कमाई केली. यानंतर शिवराजने दुहेरी पटाची पकड करुन २ गुणांची कमाई केली. मध्यंतरानंतर अभिजितने आपला आक्रमक खेळ कायम राखला. पण शिवराजला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले.
*बिराजदारची विक्रांतवर मात
लातूरच्या सागर बिराजदारसमोर पहिल्या फेरीत मुंबई पूर्वच्या विक्रांत जाधवचे आव्हान होते. यात सागर बिराजदारने विक्रांत जाधवला ४-०ने नमविले. पहिल्या फेरीत सुरुवातीला दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला.

 

यानंतर सागर बिराजदारने एक गुण घेत आघाडी घेतली. दोन्ही मल्लांनी नकारार्थी कुस्ती करायला सुरुवात केली. मात्र, सागरने वेळीच सावरत आपले कौशल्य दाखवले. त्याने साल्तो डाव टाकला आणि गुणांची कमाई केली. सागरने विक्रांतला नंतर फारशी संधीच दिली नाही.
*अक्षयची सचिनवर मात
बिडच्या अक्षय शिंदेने पुण्याच्या सचिन येलभरला नमविले. ही कुस्ती काहीशी वादग्रस्त ठरली. पहिल्या फेरीत सुरुवातीला सचिनने पहिला गुण घेतला. अक्षयने सचिनला तोडीस तोड लढत दिली.

 

पहिल्या फेरी अखेर सचिन ३-२ने आघाडीवर होता. दुस-या फेरीत दोन्ही मल्लांनी वेळकाढूपणा केला. पण लढत संपायला आणि अक्षयने गुण घेण्याची एकच वेळ झाली. नियमानुसार (अखेरचा गुण घेणारा मल्ल विजयी) पंचांनी अक्षयला विजयी ठरविले. पण वेळ संपल्याचा सचिन समर्थकाचा दावा होता. त्यामुळे दोन्ही मल्लांचे समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि आयोजकांनी मध्यस्थी केली. यानंतर पोलिसांनाही समर्थकांना आवर घालण्यासाठी यावे लागले. अखेर पंचांचा निर्णय कायम ठेवून अक्षयला विजयी घोषित करण्यात आले.

 

दरम्यान, माती गटात सोलापूरच्या माउली जमदाडेने नगरच्या योगेश पवारला चितपट केले, तर गोकुळ आवारेने किरण भगतला पुढे चाल दिली. याच गटात साईनाथ रानवडे, बाळा रफीक, विलास डोईफोडे यांनी आपले आव्हान राखले.
*सौरभ पाटीलला सुवर्ण
कोल्हापूर जिल्ह्याच्या सौरभ पाटीलने वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत गादी विभागात ६१ किलो गटात सुवर्णपदक मिळवले. सौरभ पाटीलने अंतिम फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेवर ४-०ने मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत आबासाहेबने पुणे जिल्ह्याच्या तुकाराम शितोळेचे आव्हान ६-४ने परतवून लावले.

 

तर, दुस-या उपांत्य लढतीत सौरभ पाटीलने कल्याणच्या जयशे साळवीवर ७-०ने विजय मिळवला. यानंतर तुकाराम शितोळे आणि प्रकाश कोळेकर यांनी ब्राँझपदकाची कमाई केली. ब्राँझपदकासाठीच्या लढतीत तुकारामने अहमदनगरच्या सागर राऊतला चितपट केले, तर सांगलीच्या प्रकाशने कल्याणच्या जयेशवर ६-०ने विजय मिळवला.
*प्रसादला सुवर्ण
गादी विभागात ८६ किलो गटात पिंपरी-चिंचवडच्या प्रसाद सस्तेने सुवर्णपदक मिळवले. त्याने अंतिम फेरीत साता-याच्या संजय सूळवर मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत प्रसादने कोल्हापूर जिल्ह्याच्या हृषीकेश पाटीलला ९-३ने नमविले, तर संजयने अहमदनगरच्या अक्षय कावरेवर ८-४ने विजय मिळवला.

 

हृषीकेश आणि अक्षयने ब्राँझपदक मिळवले. ब्राँझपदकाच्या लढाईत हृषीकेशने सोलापूर जिल्ह्याच्या शिवाजी पवारला १०-०ने, तर अक्षयने धुळ्याच्या मयूर लोकरेला १०-०ने नमविले.
*महाराष्ट्र केसरी गट – माती विभाग – दुसरी फेरी – तानाजी झुंजुरके वि. वि. हेमंत गरुड, कपिल सनगर वि. वि. कुणाल शेळके, पोपट घोडके वि. वि. शकील पठाण, नवनाथ पालवे वि. वि. राहुल पवार, वालरफीक शेख वि. वि. सुनील रेवनकर, विलास डोईफोडे वि. वि. अतुल पाटील, अनंत मढवी वि. वि. खंडू चिंचपाडकर, साईनाथ रानवडे वि. वि. उदयराज पाटील, ज्ञानेश्वर जमदाडे वि. वि. योगेश पवार, किरण भगत पुढे चाल वि. गोकुळ आवारे, शुभम जाधव वि. वि. उमेश ठाकरे, देविदास घोडके वि. वि. तन्वीर शेख, ज्ञानेश्वर गोचडे वि. वि. अनिल गुंजाळे, आमीष मोरे वि. वि. चेतन सोनटक्के, राजेंद्र राजभाने वि. वि. वैभव तुपे, सूरज निकम वि. वि. विजय धुमाळ.
गादी विभाग -पहिली फेरी – शुभम जैस्वाल वि. वि. हर्षद माळी, विष्णू खोसे वि. वि. भरत जोंजाळकर, महादेव सरगर वि. वि. राहुल, दत्ता धनके वि. वि. प्रतिक भक्त, कौतुक डाफळे वि. वि. अतिक शेख, गौरव गणोरे वि. वि. दिग्विजय देवकाते, महेश वि. वि. कुलदीप पाटील, मोहसीन सौदागर वि. वि. ए. शेख.