महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार

-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )

मराठी मातीतील सर्वेश्रेष्ठ मल्ल कोण ठरविणार्‍या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा डंका जालना नगरीत वाजू लागला आहे. यंदाही संभाव्य विजेत्याच्या यादीत सर्वांच्या मुखी पुण्याचा गतविजेता अभिजीत कटकेचे नाव सर्वप्रथम घेतले जात आहे. त्याला तोडीस तोड देण्यासाठी माऊली जमदाडे, गणेश जगताप, शिवराज राक्षे, सागर बिराजदार, बाला रफिक हे मल्लही यंदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत.

सलग दुसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीसाठी पुण्याचा अभिजीत कटके सज्ज झाला आहे. गत स्पर्धेत वयाच्या 21 व्या वर्षी अभिजीत महाराष्ट्र केसरी कुस्ती दंगलीत चॅम्पियन ठरला हाता. आता जॉजियातील परदेशी प्रशिक्षक लादमीर यांच्या मार्गदर्शनाव्दारे तो डबल महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी मेहनत घेतली आहे. पुण्यातील शिवरामदादा तालमीत लादमीरसह , अमर निंबाळकर, भरत म्हस्के, हनुमंत गायकवाड या चार अनुभवी वस्ताद त्याच्याकडून घाम गाळून घेतला असून तिसर्‍यांदा तो केसरी स्पर्धेच्या आखाडयात उतरणार आहे. गत दोन स्पर्धा पुण्यातील घरचे मैदानात होत्या.

शांत स्वभावाच्या अभिजीतने राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली असून रूमानियातील 23 वर्षांखालील जागतिक स्पर्धेतही त्याचे भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वश्रेष्ठ मल्ल होण्यासाठी तो सज्ज झाला आहे. मॅट विभागातून तोच अंतिम फेरी गाठेल असे त्याच्या कसून सरावावरून दिसून येत आहे. डबल महाराष्ट्र केसरीसाठी आता अभिजीत जालनात दाखल झाला आहे.

राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीत अभिजीतला हरविणार्‍या गणेश जगताप यंदा महाराष्ट्र केसरी गदेचा डार्कहार्स समजला जात आहे. गत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चंद्रहारला लोळवून हिंंगोलीचा गणेश जगताप लक्षवेधी मल्ल ठरला होता. घिस्सा डावा टाकित चंद्रहारला चितपट करीत त्याने स्पर्धेतील पहिला सनसनाटी विजय नोंदविला. यंदा अभिजीत आणि गणेशच्या मॅटवरील लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल. जो जिंकेल तोच महाराष्ट्र केसरीच्या किताबाचा हक्कदार असेल.

अर्जून पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात कसून सराव करीत गणेश केसरी किताबाच्या रणभूमीत झुंजताना दिसणार आहे. काका पवार यांच्या तालमीतील पुण्याचा शिवराज राक्षे, बीडचा गोकुळ आवारे या कुस्तीगीरांकडूनही कुस्तीशौकिनांचे लक्ष असणार आहे.

मॅटप्रमाणेच कुस्तीशौकिनांच्या नजरा यंदा मातीच्या मैदानात खिळल्या जाणार आहे. सोलापूरचा मैदानी आखाड्यात हुकुमत गाजवित असलेला माऊली जमदाडे, न्यू मोतीबाग तालमीचा बाला रफिक यांच्या कुस्त्या पहाण्यासाठी कुस्तीशौकिन उत्सुक आहेत. गंगावेश तालमीत मेहनत घेत माऊलीने गत मोसमात प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकण्याचा झंझावात सुरू ठेवला आहे. तब्बल 75 कुस्त्या एकतर्फी जिंकत तो महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात गदा जिंकण्यासाठीच खेळताना दिसणार आहे. महान कुस्तीगीर हरिश्चंद बिराजदार यांचा सुपुत्र सागरकडूनही अनेकांना आशा आहेत. महेश वरूटे, कौतुक डाफळे, अक्षय शिंदे, अतुल पाटील या अनुभवी मल्लांमध्येही खळबळजनक निकाल नोंदविण्याची क्षमता आहे.

जालनामध्ये पहिल्या दिवसापासून लक्षवेधी लढतींची ठरणार आहे. कुस्तीमहर्षी मामाासाहेब मोहोळ स्मरणार्थ देण्यात येणारी चांदीची गदा कोण पटकविणार यांची उत्कंठा आता सार्‍या महाराष्ट्राला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

छत्रपती शिवाजी महाराज चषक आंतरराज्य कबड्डी स्पर्धा असे होतील उद्घाटनाचे सामने

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी

आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन

७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं

माझं धोनीबद्दलचं मत कधीच बदलणार नाही- गौतम गंभीर