Maharashtra Kesari: पुण्याच्या सागर मारकडला सुवर्ण, साता-याच्या प्रदीपचे सुवर्णयश, उस्मानाबादचा हनुमंत चमकला

६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक

0 703
पुणे : समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी माती विभागात ५७ किलो गटात पुणे जिल्ह्याच्या सागर मारकडने सुवर्णपदक मिळवले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेने होणारी ही स्पर्धा भूगाव येथील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अ गटाच्या म्हणजे ५७ किलो, ७४ किलो आणि ७९ किलो गटाच्या कुस्त्या रंगल्या.
यात माती विभागात ५७ किलो गटात सागरने अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या ज्योतिबा अटकळेवर ४-३ अशी मात करून सुवर्णपदकाची कमाई केली. उस्मानाबादच्या दत्तात्रय मेटेने ब्राँझपदक मिळवले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत सागरने उस्मानाबादच्या दत्तात्रय मेटेला ६-१ने नमविले, तर ज्योतिबाने पुणे शहरच्या प्रशांत साठेला चितपट केले.
साता-याच्या प्रदीपचे सुवर्णयश
स्पधेर्तील गादी विभागात ५७ किलो गटात साता-याच्या प्रदीप सुळने सुवर्णपदक मिळवले. त्याने अंतिम फेरीत कोल्हापूरच्या विजय पाटीलला नमविले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत विजय पाटीलने योगेश्वर तापकीरवर ५-२ने मात केली, तर प्रदीपने बालाजीवर १०-०ने विजय मिळवला.
 
कोल्हापूरचा राकेश अव्वल
स्पर्धेतील गादी विभागातील ७४ किलो गटात कोल्हापूर जिल्ह्याच्या राकेश  तांबुळकरने अंतिम फेरीत पुणे जिल्ह्याच्या बाबासो डोंबाळेवर मात केली आणि सुवर्णपदक मिळवले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत राकेशने साता?्याच्या विशाल राजगेवर ११-४ने विजय मिळवला, तर बाबासोने धुळ्याच्या हर्षल गवणेला चितपट केले. माती विभागात नाशिक शहरच्या बाळू बोडकेने सुवर्णपदक,  सोलापूर जिल्ह्याच्या विकास बांगरने रौप्यपदक, तर कोल्हापूर शहरच्या किरण पाटीलने ब्राँझपदक मिळवले.
कोल्हापूरच्या रणजितला सुवर्ण
स्पर्धेतील गादी विभागात ७९ किलो गटात कोल्हापूर जिल्ह्याच्या रणजित नलावडेने सुवर्णपदक मिळवले. त्याने अंतिम फेरीत नाशिक शहरच्या शुभम शिंदेवर मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत रणजितने सोलापूर जिल्ह्याच्या भैरू मानेला चितपट केले, तर नीलेशने नाशिक शहरच्या शुभम शिंदेवर १०-९ने मात केली.
उस्मानाबादचा हनुमंत चमकला
स्पर्धेतील माती विभागातील ७९ किलो गटात उस्नामाबादच्या हनुमंत पुरीने सुवर्णपदक मिळवले. त्याने अंतिम फेरीत अहमदनगरच्या अजित शेळकेवर ८-४ अशी गुणांवर मात केली. नंदकुमार काकडेला ब्राँझपदक मिळाले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत हनुमंतने सोलापूर जिल्ह्याच्या नंदकुमार काकडेवर १०-०ने मात केली. तर अजित शेळकेने पुणे जिल्ह्याच्या नागेश राक्षेचे आव्हान ११-०ने परतवून लावले.
निकाल – 
माती विभाग – ५७ किलो गट – उपांत्यपूर्व फेरी – ज्योतिबा अटकळे वि. वि. सागर सूळ १२-०, प्रशांत साठे वि. वि.प्रमोद पाटील ५-३, सागर मारकड वि. वि. शिवराज हाके ६-१, दत्तात्रय मेटे वि. वि. विक्रम मोरे १०-०.
माती विभाग – ७९ किलो – उपांत्यपूर्व फेरी – हनुमंत पुरी वि. वि. नीलेश तरंगे १०-०, नंदकुमार काकडे वि. वि. रामदास जाधव ५-२, अजित शेळके वि. वि. शशिकांत बोंगार्डे १०-०, नागेश राक्षे वि. वि. सोमनाथ साष्ठे ६-२.
माती विभाग – ७४ किलो – उपांत्यपूर्व फेरी – बाळू बोडके वि. वि. वैभव शेटे चितपट, संतोष नखाते वि. वि. गणेश सरवदे चितपट, किरण पाटील वि. वि. शुभम कहार १०-०.
गादी विभाग – ७९ किलो – उपांत्यपूर्व फेरी – भैरू माने वि. वि. अमोल कोळेकर ११-०, रणजित नलावडे वि. वि. अण्णा गायकवाड १२-१, नीलेश पवार वि. वि. नानाजी कुराडे चितपट, शुभम शिंदे वि. वि. बाबासो चव्हाण १८-६.
Comments
Loading...
%d bloggers like this: