महाराष्ट्र केसरी यशोगाथा ४- अबब! ६०० लढती १२४ पंच अन् चमचमणारी गदा

-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )

सलग तीन दिवस संघर्षपूर्ण लढती 3 आखाड्यात रंगतात. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिडशे-दोनशे नव्हे तर तब्बल 700 कुस्त्या होतात. हेदेखिल केसरी स्पर्धेचे एक वैशिष्टयच आहे. इतक्या लढती इतर कोणत्याच कुस्ती मैदानात व खेळातही एकाच स्पर्धेत होत नाही. मुख्य महाराष्ट्र केसरीच्या 80 लढती होतात. इतर गटांच्या मॅट व माती प्रत्येकी 300-300 अशा एकूण 600 कुस्त्या होतात.

सकाळ व दुपारच्या सत्रात दिवसाअखेरी 100 कुस्त्यांचा निकाल लावण्याची जबाबदारी 125 पंच मोठ्या कुशलतेने पार करतात. 10 मिनिटांच्या आत एक कुस्ती संपवली जाते. यासाठी 5 जणांचा संघ कुस्ती होण्यासाठी कष्ट घेत असतो. आखाडा प्रमुख, पंच, साईड पंच, नियंत्रक आणि वेळ अधिकारी असा संघ कुस्ती यशस्वीपणे खेळवित असतो.

स्पर्धेच्या काळात हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, ऑलिम्पिकपटू, आशियाई-राष्ट्रकुल विजेत्यांना विशेष आमंत्रण दिले जातात. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, गणपत आंदळकर, दीनानाथसिंह, दादू चौगुले, अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार यांच्यासह सर्वांचाच विशेष गुणगौरव समारंभही कुस्ती अधिवेशन आणि केसरी स्पर्धेच्या निमित्ताने आयोजक करीत असतात. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कालावधीत हा सन्मान केला जातो. नव्या खेळाडूंना दिग्गज कुस्तीगिरांकडून प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रमही अधिवेशनाचे एक वैशिष्ठठ्य असते.

केसरी किताबाची अंतिम कुस्ती होण्यापूर्वी एक दिवस आधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषेदची सर्वसाधारण सभा होते. सर्व संलग्न 44 तालीम संघातील दोन प्रतिनिधी या सभेला उपस्थित असतात.आगामी कुस्ती स्पर्धेचे नियोजन आणि कुस्ती विकासाचे महत्त्वाचे ठराव या सभेत मांडले जातात. गतवर्षी झालेल्या ठरावांवर कितपत कार्यवाही झाली याची चर्चाही केली जाते. खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपताच सर्वांना वेध लागलात ते नवा महाराष्ट्र केसरी कोण होणार याचेच.

महाराष्ट्र केसरीची उपांत्य लढत आधीच्या दिवशी होती. शेवटच्या दिवशी केवळ अंतिम लढती होतात. सकाळच्या सत्रात सर्वच्या सर्व गटातील अंतिम लढती खेळविल्या जातात. या लढती संपताच विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांनी गौरविले जाते. गेली काही वर्षांपासून या गटातील विजेत्यांनाही रोख रक्कम दिली जात आहे.

संध्याकाळच्या सत्रात दोन-चार मॅट व मातीवरील लढती झाल्यानंतर मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व भाषण होते. हे सोपस्कार पूर्ण होताच मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीची कुस्ती लावली जाते. काही मिनिटातच मल्लांची सलामी होते. 3 – 3 मिनिटांच्या दोन फे र्‍यांच्या चुरसपूर्ण लढतीत महाराष्ट्र केसरीचा नवा विजेता मैदान गाजवितो. यावेळी सर्वत्र वातावरण कुस्तीमय झालेले असते. 50 हजारांपेक्षा अधिक कुस्तीशौकिन महाराष्ट्र केसरीचा विजेता याची देही याची डोळा पाहिलेला असतो. आपणही एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो हा आनंद प्रत्येकाला असतो.

विजेत्या मल्लांच्या समर्थकांच्या जल्लोषात मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा आणि 1 लाख रूपयांचे रोख बक्षीस महाराष्ट्र केसरी विजेत्याला सन्मानपूर्वक दिले जाते. गदेचा किताब देताच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि कुस्ती अधिवेशनाचे सूप वाजते. महाराष्ट्र केसरीच्या अजिंक्यवीराचे सर्वत्र स्वागत केले जाते. पराभूत कुस्तीगीर पुन्हा एकदा मेहनतीसाठी सज्ज होतात. आता जिंकायचेच असा निर्धार करून राज्याच्या तालमीतून पुन्हा एकदा सरावांचा हुंकार सुरू होतो.

हलगीचा निनाद अन् रंग भरणारे समालोचन
मरगळलेल्या कुस्तीपेशाला आता नवसंजीवनी मिळत आहे. यात हलगीच्या निनादाने कुस्तीमय वातावरण करणारे राजू आवळे आणि कुस्तीत जान आणणारे समालोचन करणारे शंकर पुजारी, बाबासाहेब निम्हण यांचे मोठे योगदान आहे.

कुस्ती मैदानात लक्ष वेधणारे आवळे आणि पुजारी हे आपल्या कलेने कुस्तीशौकिनांना खिळवून ठेवतात. आवळेंच्या खणखणाटाने तन, तर पुजारी यांच्या बहारदार समालोचनाने मन जागे होते. कुस्तीमय होते.

महत्त्वाच्या बातम्या:

महाराष्ट्र केसरी यशोगाथा ३- उत्तरोत्तर रंगणारा कुस्ती सोहळा

महाराष्ट्र केसरी यशोगाथा २- कुस्तीगीरांचा कुुंभमेळ्यात डंका लालमातीचाही

महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व

महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- मोहोळ कुटुंबियाकडून सलग 35 व्या वर्षी गदेचे बक्षिस

महाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक...

महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी