टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत केविन अँडरसन, इवो कार्लोविच यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

दुसऱ्या फेरीत लातवियाच्या एर्नेस्ट गुलबीसचा कोरियाच्या हियोन चूँगला पराभवाचा धक्का; पहिल्या फेरीत पुण्याच्या अर्जुन कढेचे आव्हान संपुष्टात

पुणे । एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत विम्बल्डन विजेता केविन अँडरसन, लातवियाच्या एर्नेस्ट गुलबीस, क्रोएशियाच्या इवो कार्लोविच या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या दुसऱ्या फेरीत 1तास 38मिनिटे चाललेल्या या सामन्यात लातवियाच्या जागतिक क्र.95असलेल्या एर्नेस्ट गुलबीसचा कोरियाच्या जागतिक क्र.25असलेल्या हियोन चूँगवर टायब्रेकमध्ये 7-6(2), 6-2असा विजय मिळवत खळबळजनक निकालाची नोंद केली. सामन्यात पहिल्या सेटमध्ये 5-1अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या एर्नेस्टने जोरदार खेळ करत चूँगची सातव्या, नवव्या सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 5-5अशी बरोबरी साधली.

त्यांनंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये एर्नेस्टने चूँगवर 7-6(2)असा विजय मिळवत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील एर्नेस्टने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत चूँगविरुद्ध हा सेट 6-2असा जिंकून विजय मिळवला.

जागतिक क्र.6असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सर्बियाच्या लासलो जेरीचा 7-6(7-3), 7-6(8-6) टायब्रेकमध्ये असा पराभव करून आगेकूच केली. अतितटीच्या झालेल्या 2तास 8मिनिटे चाललेल्या या सामन्यात लासलो जेरीने केविनला कडवी झुंज दिली. पण केविनच्या बिनतोड सर्व्हिसच्या माऱ्यापुढे जेरीची खेळी निष्प्रभ ठरली.

पहिल्या सेटमध्ये केविनने जेरीची चौथ्या गेममध्ये, तर जेरीने केविनची सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये केविनने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर हा सेट 7-6(7-3)असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये केविनने आपले वर्चस्व कायम राखत जेरीचा 7-6(8-6)असा पराभव करून विजय मिळवला.

एकेरीत पहिल्या फेरीत पुण्याच्या अर्जुन कढे याला सर्बियाच्या लासलो जेरीकडून 7-5, 7-6(6) असा पराभव पत्करावा लागल्याने त्याचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. 1 तास 43मिनिटे चाललेल्या या सामन्यात अर्जुनने सुरुवातीला सुरेख खेळ केला. दुसऱ्याच गेममध्ये अर्जुनने जेरीची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतः ची सर्व्हिस राखत 3-0अशी आघाडी घेतली.पण हि आघाडी अर्जुनला टिकवता आली नाही. सातव्या गेममध्ये जेरीने अर्जुनची सर्व्हिस ब्रेक केली व 4-4अशी बरोबरी साधली. त्यानंतर जेरीने आपल्या बिनतोड सर्व्हिस आणि आक्रमक खेळीच्या जोरावर अर्जुनची पुन्हा 11व्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. जेरीने हा सेट अर्जुनविरुद्ध टायब्रेकमध्ये 7-6(6)असा जिंकून विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट:मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी):
एर्नेस्ट गुलबीस(लातविया)वि.वि. हियोन चूँग(कोरिया)7-6(2), 6-2;
केविन अँडरसन(दक्षिण अफ्रिका)वि.वि.लासलो जेरी(सर्बिया) 7-6(3), 7-6(8-6);
इवो कार्लोविच(क्रोएशिया)वि.वि.एव्हेग्नी डॉंस्काय(रशिया) 6-4, 7-5;