महाराष्ट्राच्या विजयात तुषार पाटील चमकला, अनुप कुमारची हरियाणा पराभूत

मुंबई । ऐनवेळी कर्णधार रिशांक देवाडिगाला विश्रांती देण्यात आलेल्या आणि दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या गिरीश इर्नाकच्या अनुपस्थितीत आज महाराष्ट्राच्या संघाने अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील हरियाणा संघाचा ८ गुणांनी पराभव केला. या विजयाबरोबर महाराष्ट्राच्या संघाने अ गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्यफेरीत प्रवेश केला.

या सामन्यात खऱ्या अर्थाने चमकला तो तुषार पाटील. या प्रतिभावान खेळाडूने सुरिंदर नाडा, रवींद्र पहल आणि संदीप नरवाल अशा दिग्गजांची बचाव फळी असताना महाराष्ट्राने तुषारने रेडींगमध्ये घेतलेले गुण हे अफलातून होते. त्याने १७ रेडमध्ये १० गुण आणि १ बोनस असे ११ गुण घेतले.

निलेश साळुंखेनेही रेडींगमध्ये चांगली कामगिरी करताना १० रेडमध्ये ७ गुण घेतले.

हरियाणाकडून या सामन्यात कर्णधार अनुप कुमारला पूर्वार्धात एकही गुण मिळाला नाही यावरून महाराष्ट्राच्या बचाव फळीतील कामगिरीचा अंदाज येतो. अनुपला १६ रेडमध्ये केवळ ३ गुण मिळवता आले.

विशाल मानेचे डॅश, विराज लांडगे आणि कृष्ण मदने यांनी बचाव फळीत चांगली कामगिरी केली. विशाल मानेने पकडीत ६ गुण घेतले.

महाराष्ट्राच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आनंद-

” आम्ही ज्या योजना आखल्या होत्या त्याप्रमाणे खेळ झाला. पहिल्यापासूनच आम्ही समोरच्या संघाला जास्त गुण न देता एखादा गेला तरी चालेल परंतु व्यवस्थित खेळ करत समोरच्या संघाला आघाडी मिळवून द्यायची नाही असे ठरवले होते. तुषारने आज चांगली कामगिरी केली. तो पुढच्या सामन्यात अजून चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे. “असे संघाचे प्रशिक्षक माणिक राठोड म्हणाले.