फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला पराभूत करत कर्नाटक अंतिम फेरीत

मुंबई । सुकेश हेगडे, प्रशांत राय आणि शब्बीर बापू या रेडरच्या अप्रतिम कामगिरीमुळे आणि तेवढीच चांगली बचावात मिळालेल्या साथ यामुळे कर्नाटकने उपांत्य फेरीत महाराष्ट्राला नमवत अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्राला या सामन्यात ३८-३१ असे पराभूत व्हावे लागले.

कर्नाटकने सर्वच आघाड्यांवर यावेळी चांगल्या लयीत दिसले. बचाव आणि आक्रमण यांचा सुरेख मेळ यात दिसला. पहिली काही मिनिटे सामना सुरु झाल्यावर एम्प्टी रेडमध्ये गेला परंतु त्यानंतर रिशांकने बोनस गुण घेत महाराष्ट्राचे खाते खोलले.

परंतु त्यानंतर संघाला कर्नाटकने कधीही आघाडी घेऊ दिली नाही. महाराष्ट्राच्या संघाकडून लॉबीमध्ये जाणे आणि आणि काही टाळता येण्यासारख्या चुका झाल्या. याचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला. एकवेळ ३-५अशी कर्नाटककडची आघाडी १०-१७, १०-१९ असा करत पूर्वाधाच्या शेवटी १५-२२ अशी झाली. यात रिशांक, निलेश आणि तुषार हे रेडर पूर्ण लयीत दिसले नाही. पंचांचे अनेक निर्णय यावेळी महाराष्ट्राच्या विरोधात जाताना दिसले.

उत्तरार्धातही महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. यामुळे पुन्हा आघाडी वाढतच गेली. शेवटी रिशांक, निलेश आणि बाकी खेळाडूंची पकड होत गेल्या आणि कर्नाटककडे ३२-१९ अशी आघाडी झाली. अखेरची काही मिनिटे तर मैदानावर विशाल, गिरीश आणि नितीन मदने हे तीनच खेळाडू होते. त्यानंतर मैदानात आलेल्या निलेश साळुंकेने काही गुण घेतले.

४ मिनिटे बाकी असताना कर्नाटककडे ३८-२७ अशी आघाडी होती आणि निलेशची पकड झाल्यामुळे मैदानात एकही मुख्य रेडर नव्हता. शेवटची काही मिनिटे तुषारने चांगला खेळ केला परंतु अखेर कर्नाटकने ३९-३१ असा विजय मिळवला.

कर्नाटककडून सुकेशने १६ चढायांमध्ये ६ गुण आणि १ बोनस, प्रशांत रायने १५ चढायांमध्ये ४ गुण आणि ३ बोनस तर शब्बीर बापूने ११ चढायांमध्ये ४ गुण आणि १बोनस घेतला. तर महाराष्ट्राकडून रिशांक देवाडिगाने १२ चढायांमध्ये ४ गुण आणि १ बोनस गुण तर तुषार पाटीलने १० चढायांमध्ये ६ गुण आणि १ बोनस गुण घेतला. विशाल मानेने तीन पकडी केल्या.