रणजी ट्रॉफी: कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्राचा दारुण पराभव

पुणे । विनय कुमार नेतृत्व करत असलेल्या कर्नाटक संघाने महाराष्ट्र संघाला घरच्याच मैदानावर १ डाव आणि १३६ धावांनी पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रातच कर्नाटकने विजयावर शिक्कामोर्तब केले.

कालच्या ४ बाद १३५ वरून पुढे खेळायला सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्र संघाला आज सकाळच्या सत्रात ११२ धावांची भर घालता आली. महाराष्ट्राकडून केवळ ऋतुराज गायकवाड (६५), राहुल त्रिपाठी (५१) आणि रोहित मोटवानी (४९) यांना ठीकठाक कामगिरी करता आली परंतु त्यांना संघाला पराभवापासून रोखता आले नाही.

अभिमन्यू मिथुनने दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी करताना कर्नाटकाकडून १७ षटकांत ५७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

या विजयबरोबर अ गटात ३ सामन्यातील ३ विजयांसह कर्नाटक अव्वल स्थानी आले तर ३ सामन्यात १ विजय आणि १ पराभवामुळे महाराष्ट्र ४थ्या स्थानी फेकले गेले.

एका गटातून केवळ दोनच संघ पुढच्या फेरीत जाणार असल्यामुळे महाराष्ट्राला आता पुढच्या सामन्यांत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

संक्षिप्त धावफलक:
महाराष्ट्र पहिला डाव: सर्वबाद- २४५
कर्नाटक पहिला डाव: ५ बाद ६२८
महाराष्ट्र दुसरा डाव: सर्वबाद २४७