महाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद

पुणे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यामध्ये म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधरण विजेतेपद यजमान महाराष्ट्राच्या संघाने पटकाविले. तसेच मागील वर्षी विजेते असलेल्या हरयाणाला यंदा द्वितीय आणि दिल्लीच्या संघाला तृतीय क्रमांकाचा करंडक प्रदान करण्यात आला.

शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन सभागृहात झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय क्रीडासचिव राहुल भटनागर, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संचालिका नीलम कपूर, राज्याच्या शिक्षण व क्रीडाखात्याच्या सहसचिव वंदना कृष्णा, दीपक भायसेकर, भारतीय आॅलिंपिक संघटनेचे सहसचिव ओंकार सिंग, चैतन्य दिवाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख विजय संतान यांसह खेळाडूंनी विजेतेपदाचा करंडक स्विकारला.

यावेळी उपस्थित खेलो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप प्रधान, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, युथ गेम्सच्या आयोजन समितीचे चेअरमन राजेंद्र पवार, क्रीडामंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद ढेकणे, क्रीडा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी आयोजनात महत्वाचा वाटा उचलला.

प्रकाश जावडेकर म्हणाले, खेलो इंडियाच्या विविध स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत आणि जे स्पर्धा पाहण्यासाठी आले त्यांचेही विशेष अभिनंदन. खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया, जे खेळाडू खेळतात आणि जे खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला येतात हाच नवा भारत आहे. शाळांमध्ये पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रम खूप आहे. परंतु खेळ नाहीत, म्हणून आम्ही निर्णय घेतलाय आगामी काळात प्रत्येक शाळेत खेळाचा १ तास नक्की असेल. खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया, असेही त्यांनी सांगितले.

विनोद तावडे म्हणाले, खेलेगा महाराष्ट्र तो खेलेगा राष्ट्र. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांचे मी आभार मानतो, त्यांनी महाराष्ट्राला खेलो इंडियाचे आयोजन करण्याची संधी दिली. देशभरातून येथे खेळाडू आले आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी शाळेच्या ५५ हजार विद्यार्थांनी हजेरी लावली. अतिशय सुंदर नियोजन महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याने केले. चांगल्या खेळाडूंची कामगिरी अजून कशी चांगली होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आज महाराष्ट्राला सर्वाधिक पदके आहेत याचा आम्हाला आनंद आहे. परंतु आम्हाला खेळामध्ये देश पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे.

नीलम कपूर म्हणाल्या, खेलो इंडिया हा देशातील क्रीडाक्षेत्रातील महाउत्सव आहे. यामध्ये १० हजार लोकांचा सहभाग होता. ज्यामध्ये ६ हजार खेळाडू, १ हजार सहाय्यक वर्ग, ९०० तांत्रिक अधिकारी, १ हजार स्वयंसेवक आणि १५०० अधिकारी होते. मागील वर्षीपेक्षा दुप्पट सहभाग यंदा होता. यंदा टेनिस आणि टेबल टेनिस हे दोन खेळ देखील वाढविण्यात आले होते, यामुळे खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात आले.

खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ ची पदकतालिका

१ महाराष्ट्र – सुवर्ण ८५  रौप्य ६२ कास्यं८१ – २२८
२  हरयाणा – सुवर्ण ६२ रौप्य ५६ कास्यं६० – १७८
३ दिल्ली – सुवर्ण ४८ रौप्य ३७ कास्यं ५१ – १३६
४ कर्नाटक – सुवर्ण३० रौप्य २८ कास्यं १९ – ७७
५ तामिळनाडू – सुवर्ण २७ रौप्य ३५ कास्यं २५  – ८७
६ उत्तरप्रदेश – सुवर्ण २३ रौप्य २५ कास्यं ४० – ८८
७ पंजाब – सुवर्ण – २३ रौप्य १९ कास्यं ३० – ७२
८ गुजरात – सुवर्ण – १५ रौप्य ०९ कास्यं १५ – ३९
९ पश्चिम बंगाल – सुवर्ण१३ रौप्य १५ कास्यं १६ – ४४
१० केरळ सुवर्ण – १२ रौप्य १६ कास्यं ३०  – ५८

 

रविवारी (दि.२०) दिवसभरात

व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश

महाराष्ट्राच्या मुलींना १७ वर्षाखालील गटात पुन्हा रौप्यपदक मिळाले. अंतिम फेरीत त्यांना पश्चिम बंगाल संघाकडून १५-२५, १३-२५, १४-२५ असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राकडून श्रुती मासळे व तेजस्विनी मलगुंडे यांंनी कौतुकास्पद खेळ केला. पश्चिम बंगालकडून दिशा देवांशी व ईशा घोष यांनी स्मॅशिंगमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला. गतवर्षीही महाराष्ट्राला अंतिम फेरीत पश्चिम बंगाल संघानेच पराभूत केले होते.

मुलांच्या २१ वर्षाखालील गटात केरळ संघाने अजिंक्यपद पटकाविले. उत्कंठापूर्ण अंतिम लढतीत त्यांनी तामिळनाडू संघावर २१-२५, २५-१५, २५-२३, २५-२० असा विजय मिळविला. त्याचे श्रेय रुनी सेबॅस्टियन व राहुुलकुमार यांच्या चतुरस्त्र खेळास द्याावे लागेल.

तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध

एकाग्रता व जिद्द यांचा सुरेख समन्वय राखून साक्षी शितोळे व ईशा पवार या महाराष्ट्राच्या खेळांडूंनी तिरंदाजीमध्ये सुवर्णवेध घेत आपल्या राज्यास खेलो इंडिया महोत्सवात यशस्वी सांगता करुन दिली. प्रथमेश जावकर याचे सुवर्णपदक केवळ एका गुणाने हुकले.

आर्मी स्पोटर््स इन्स्टिट्युट येथे झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत साक्षी हिने २१ वर्षाखालील मुलींच्या विभागात रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. तिने अंतिम फेरीत पश्चिम बंगालच्या सुपर्णा सिंग हिला ६-० अशा फरकाने हरविले.

शेतक-याची पोर लई हुशार

साक्षी ही पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्याालयात शिकत असून ती रणजीत चामले यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंदाजीचा सराव करते. साक्षी ही मूळची दौंड तालुक्यातील पाडवी या खेडेगावची असून तिचे वडील शेतकरी आहेत. तिने आतापर्यंत चार वेळा आशिया चषक स्पर्धेत भाग घेत दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे. साक्षी हिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर सांगितले, येथे सुवर्णपदक मिळविण्याची मला खात्री होती. खेलो इंडिया महोत्सव हा आॅलिंपिकसाठी महत्त्वाचा असल्यामुळे येथील विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

मुलींच्या १७ वर्षांखालील गटात ईशा पवार हिने कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक राखले. तिने १५० गुणांपैकी १४५ गुणांची कमाई करीत उल्लेखनीय कामगिरी केली. या प्रकारात राज्य विक्रम नोंदविणाºया ईशा हिने गतवेळीही खेलो इंडियामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अखिल भारतीय स्तरावर तिला अग्रमानांकनही असून ती गेली चार वर्षे ओंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. डेरवण येथील एस.व्ही.जे शिक्षण संस्थेत ती शिकत असून गतवर्षी तिने दक्षिण आशियाई स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले होते.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर पंधरा वषार्ची खेळाडू ईशा म्हणाली, या सुवर्णपदकाचे श्रेय माझ्या पालकांना व प्रशिक्षक घाडगे यांना द्यावे लागेल. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी या खेळात आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकले आहे. आगामी युवा जागतिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत सर्वोच्च यश संपादन करण्याचे माझे ध्येय आहे.

मुलांच्या १७ वर्षाखालील गटात प्रथमेश याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १५० गुणांपैकी १४२ गुण मिळविले. दिल्लीच्या ऋतिक चहल याने १४३ गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. उत्कंठापूर्ण लढतीत त्याने ऋतिकला चिवट झुंज दिली मात्र शेवटच्या महत्त्वपूर्ण क्षणी त्याला वाºयाचा अंदाज आला नाही व त्याचे सुवर्णपदक हुकले.

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई

महाराष्ट्राच्या सृष्टी हळगेंडी हिला २१ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत उपांत्य फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला कास्यंपदकाची कमाई झाली. मुलांच्या १७ वर्षाखालील दुहेरीत महाराष्ट्राच्या हृषिकेश मल्होत्रा व दीपित पाटील या जोडीला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यंपदकावर समाधान मानावे लागले.

सृष्टी ही मुंबईत आरे पोद्दार महाविद्यालयात शिकत आहे. ती ठाणे येथे शैलजा गोहाड यांच्याकडे प्रशिक्षण घेत असून आजपर्यंत तिने राज्य स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांमध्येही तिने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

स्पर्धेबाबत ती म्हणाली, येथील वातावरण खूप प्रोत्साहनवर्धक होते. येथील सर्व सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होत्या. खेलो इंडिया ही संकल्पना खूपच चांगली असून अशा महोत्सवातून भावी ऑलिंपिक पदक विजेते घडविण्यास मदत होणार आहे. टेबल टेनिसमधील खेळाडूंना भरपूर सुविधा व सवलती मिळू लागल्या आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याच्या संधीही मिळत आहेत. त्यामुळेच राष्ट्रकुल क्रीडा व आशियाई क्रीडा स्पर्धांसह अनेक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमक दाखवू लागले आहेत. भारतीय संघात स्थान मिळविण्याचे माझे ध्येय असून ते साकार करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. मला पालकांकडून भरपूर प्रोत्साहन मिळत आहे.