राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघ रवाना

मुंबई। पटना येथे होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी महिला स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघ मुंबई येथून रवाना झाला. मुंबई सीएसटीएम येथून आज ११:०५ वाजता सुविधा एक्सप्रेस ने संघ बिहार-पटना साठी निघाला.

जवळपास दोन दिवसाच्या (१७५० किमी) प्रवासानंतर संघ उद्या संध्याकाळी ४:३० वाजेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी पोहचेल. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील १२ पैकी ६ खेळाडु पहिल्यादाच यास्पर्धेत खेळणार आहेत. तर उर्वरित ६ खेळाडूंनी याआधी स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे.

“अतिशय समतोल असा महाराष्ट्राचा महिला संघ यास्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करेल हा विश्वास आहे” असे मत संघ प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार यांनी व्यक्त केले. प्रशिक्षक राजू भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र महिला संघ उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून देईल अशी आशा आहे.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांकर बाग, पटना येथे ११ जुलै ते १४ जुलै २०१९ दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.

महाराष्ट्र महिला संघ: सायली केरीपाळे (कर्णधार), स्नेहल शिंदे, दीपिका जोशप, कोमल देवकर, अर्चना करडे, अंकिता जगताप, सोनाली हेळवी, श्रद्धा पवार, पूजा यादव, ज्योती पवार, आम्रपली गलांडे, सायली नागवेकर
संघ प्रशिक्षक: राजू भावसार
संघ व्यवस्थापिका: मनीषा गावंड