६६ वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रांची विजयी सलामी. जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल.

महाराष्ट्राने मध्यप्रदेशचा ४४-२०असा पराभव करीत “६६व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” विजयी सलामी दिली. पाटलीपुत्र क्रीडा संकुल-बिहार येथे आज पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने फ गटात विजय मिळविताना सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाला सुरुवात केली.

पूर्वार्धात एक लोण देत २२-१२ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात देखील तोच जोश कायम राखत आणखी दोन लोण देत सामना २४ गुणांनी आपल्या नावे केला. महाराष्ट्राच्या या मोठ्या विजयाचे श्रेय कोमल देवकर, सायली नागवेकर यांच्या आक्रमक चढाईला आणि अर्चना करडेच्या भक्कम बचावाला जाते.

या अगोदर झालेल्या सामन्यात यजमान बिहारने अ गटात उत्तराखंडला ५२-१७ असे नमवित बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आगेकूच केली. कारण या गटात तीनच संघ आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या शेवटच्या सामन्यांत रेल्वे ने ४७-०१ असा जम्मू-काश्मीर संघाचा धुव्वा उडवला.

पहिल्या दिवसाचे संक्षिप्त निकाल:
१) बिहार ५२-१७ उत्तराखंड 
२) चंदीगड १८-३१ प. बंगाल 
३) ओडिसा ५०-१९ आसाम 
४) हरियाणा ५५-२६ मणिपूर 
५) महाराष्ट्र ४४-२० मध्य प्रदेश 
६) केरळ ३३-३७ राजस्थान 
७) उत्तर प्रदेश ४१-०७ पॉंडिचेरी 
८) पंजाब ५८-१० झारखंड 
९) हरियाणा ३६-२२ दिल्ली 
१०) रेल्वे ४७-०१ जम्मू आणि काश्मीर