महाराष्ट्राचा गुजरातवर ४ विकेट्स राखून विजय

राजकोट । सईद मुश्‍ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने आज गुजरात संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. महाराष्ट्राकडून फलंदाजीमध्ये निखिल नाईकने चमकदार कामगिरी करताना ३७ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या.

महाराष्ट्राच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. निर्णय योग्य ठरवत अक्सर पटेल कर्णधार असलेल्या गुजरातला महाराष्ट्राने २० षटकांत ८ बाद १५१ धावांवर रोखले. गुजरातकडून चिराग गांधीने नाबाद ६१ तर अक्सर पटेलने ३८ धावा केल्या. गोलंदाजीत डॉमनिक मुथुस्वामीने महाराष्ट्राकडून ४ विकेट्स घेतल्या.

गुजरातने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. केदार जाधवच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणाऱ्या राहुल त्रिपाठीला विशेष चमक दाखवता आली नाही. भरवशाचा फलंदाज अंकित बावणेही १ धावेवर बाद झाला. परंतु प्रयाग भाटी(२३) आणि निखिल नाईक (७०) यांनी महाराष्ट्राचा विजय साकार केला.

अन्य लढतीमध्ये मुंबई संघाला बडोदा संघाविरुद्ध १३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

महाराष्ट्राची उद्या सौराष्ट्र संघाशी लढत होणार आहे.