खेलो इंडिया: अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या दुर्गा देवरेला सुवर्ण; कुस्तीमध्ये महाराष्ट्राला तीन रौप्य

पुणे। महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा देवरे हिने अ‍ॅथलेटिक्समधील पहिल्या दिवशी आपल्या राज्याला आणखी एक सोनेरी यश मिळवून दिले. तिने २१ वषार्खालील मुलींच्या गटात पंधराशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. तिने हे अंतर ४ मिनिटे ३७.१८ सेकंदात पूर्ण केले. ती नाशिक येथे विजेंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने या शर्यतीत दिल्लीच्या अंकिता चहल (४ मिनिटे ३७.३३ सेकंद) व राधा चौधरी (४ मिनिटे ४१.०७ सेकंद) यांच्यावर मात केली.

कुस्तीमध्ये महाराष्ट्राला तीन रौप्य :-

कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या गोकुळ यादव व रोहित अहिरे यांनी मुलांच्या विभागात तर भाग्यश्री फंड हिने मुलींमध्ये रुपेरी कामगिरी केली. मुलींच्या १७ वषार्खालील गटात भाग्यश्री फंड हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम फेरीत हरयाणाच्या नोजू हिने सहज हरविले. संजना बागडी व सुप्रियाकुमारी या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ६५ किलो गटात ब्राँझपदक पटकाविले. ६१ किलो गटात महाराष्ट्राच्या सृष्टी भोसले हिने ब्राँझपदक मिळविले. ५३ किलो गटात दिशा करांडे हिने ब्राँझपदकाची कमाई केली. ४९ किलो गटात स्मिता पाटील हिने ब्राँझपदक मिळविले.

मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या गोकुळ यादव याला रौप्यपदक मिळाले. ७७ किलो गटातील अव्वल साखळी लढतीत त्याने हरयाणाच्या अंकितकुमार याला हरविले मात्र त्याला अन्य लढतीत अमितकुमार या हरयाणाच्या मल्लाने त्याला पराभूत केले. या गटातच तीनच मल्ल सहभागी झाले होते. ७२ किलो गटात महाराष्ट्राच्या रोहित अहिरे याला रौप्यपदक मिळाले. त्याला राजस्थानच्या छगनकुमार याने एकतर्फी लढतीत पराभूत केले. ९७ किलो विभागात महाराष्ट्राच्या दिग्विजय भोंडवे याने ब्राँझपदकाची कमाई केली.

ज्युदो स्पर्धेत प्रथम गुरवला ब्राँझपदक :-

महाराष्ट्राच्या प्रथम गुरव याने ब्राँझपदक मिळविले. त्याने १७ वषार्खालील मुलांच्या ५५ किलो गटात हे पदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीच्या ज्युदोकांनी सहापैकी तीन गटांमध्ये सुवर्णपदके जिंकून वर्चस्व गाजविले.