राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या जश, पृथा यांची चमक 

वडोदरा | महाराष्ट्राच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्ट्स 64 व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चमक दाखवली. जश मोदीने आपल्यापेक्षा चांगली क्रमवारी असलेल्या खेळाडूला नमवित 14 वर्षाखालील मुलांच्या एकेरी गटात चमक दाखवली तर, पृथा वर्तीकरने मुलींच्या 14 वर्षाखालील एकेरीच्या गटात रौप्यपदक मिळवले.   
 
जश मोदीने दिल्लीच्या सी.बी.एस.ई.च्या शिवम चंद्राच्या 3-1 अशा फरकाने उपांत्यपुर्व फेरीत पराभव केला. यानंतर त्याने चंदीगढच्या अर्नव अग्रवालला 3-0 असे नमवित अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात भारताच्या 30 व्या मानांकित महाराष्ट्राच्या जशसमोर सी.बी.एस.ई. दिल्लीच्या भारताच्या 11 व्या मानांकित आदर्श ओम छेत्रीचे आव्हान होते. पण, जशने ओमला 3-0 (11-3, 11-7, 13-11) असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.
 
मुलींच्या 14 वर्षाखालील गटातील एकेरीच्या सामन्यात भारताच्या 26 व्या मानांकित पृथाने आपल्याच राज्याच्या तनीशा कोटेचाला 3-2 असे पराभूत करत उपांत्यफेरीत स्थान मिळवले. यानंतर तिने  पुदुच्चेरीच्या सस्था चंद्रालेहाला नमवित अंतिम फेरीतील आपली जागा निश्‍चित केली. अंतिम फेरीत मात्र पृथाच्या विजयी प्रवासाला ब्रेक लागला. आपल्यापेक्षा चांगली क्रमवारी असलेल्या दिल्लीच्या लक्षिता नारंगने (भारताची 12 वी मानांकित खेळाडू) पृथाला 3-1 असे नमविले. त्यामुळे पृथाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.