मराठमोळ्या गिर्यारोहक दीपक कोनाळेने सर केले माउंट एल्ब्रुस

पुणे। युरोप खंडातील सर्वांत उंच मानल्या जाणारे माउंट एल्ब्रुस ज्याची उंची तब्बल 5 हजार 642 मीटर आहे, अशा शिखरावर युवा गिर्यारोहक दीपक कोनाळे याने आणि त्याच्या दहा जणांच्या संघाने भारताचा ध्वज फडकून व तिथे राष्ट्रगीत गाऊन विश्व विक्रम केलेला आहे. या विश्वविक्रमाची नोंद ‘हाय रेंज बूक ऑफ वर्ल्ड’ मध्ये करण्यात आली आहे.

आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलीमांजारो हे शिखर सर करून तेथे भारताचा सर्वांत मोठा ध्वज दीपकने मागील वर्षी फडकावला होता. त्यानंतर आता युरोपमधील माउंट एल्ब्रुस शिखर त्याने सर केले आहे. त्याच्यासोबत या मोहिमेत विविध राज्यांतील 10 गिर्यारोहकांचा समावेश होता. महाराष्ट्रातून दीपक हा एकमेव होता.

माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानले जाते. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखले जाते. तेथील तापमान उणे 25 डिग्रीपर्यंत असते. याबाबतचे योग्य ते प्रशिक्षण घेऊन तो 29 जून रोजी भारतातून रवाना झाला होता. त्यानंतर 1 जुलैपासून शिखरावर चढाई करण्यास सुरूवात केली. ही मोहीम शनिवार दि. 6 जुलै रोजी सकाळी पूर्ण झाली. प्रचंड थंडी आणि वार्‍याचे घोंगावणारे झोत अशा वातावरणात आम्ही सहा दिवस काढले. वातावरण सतत बदलत होत होता, तरी आम्ही मोहीम पूर्ण केली. माझ्यासोबत तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश अशा राज्यांतील गिर्यारोहक होते. विशेष म्हणजे दोन मुलींचाही या मोहिमेत समावेश होता. त्यापैकी एका मुलीने हे शिखर सर केले, असा अनुभव दीपकने सांगितला.

तसेच या मोहिमेसाठी गुरूवर्य सुरेंद्र शेळके सरांचे मार्गदर्शन लाभले असून पिंपरी चिंचवडचे उद्योजक नंदकुमार साळुंके यांनी मला आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच रोहित पवार आणि रोहित टिळक यांचे सहकार्य मिळाले.

तसेच गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलीमांजारो (5895 मीटर) हे शिखर सर करून तिथे सुद्धा विश्व विक्रम केलेला आहे. त्याची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ तसेच ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे.