मुंबई अस्त्र-पुणेरी उस्ताद यांच्यात रंगला अटीतटीचा सामना; ३-३ने लढती समसमान ठरल्या

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या पहिल्या दिवसामध्ये कुस्तीचा थरार बघायला मिळाला. कुस्तीच्या या महामुकाबल्यामध्ये पहिल्या सामन्यात यशवंत साताराने कोल्हापुरी मावळे संघावर कुरघोडी केली. साताऱ्याच्या कुस्तीगीरांना ५-१ने लढती जिंकत मावळ्यांना चितपट केले. तर दुसऱ्या सामन्यात, मुंबई अस्त्र विरुद्ध पुणेरी उस्ताद यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. दोन्ही संघांनी ३-३ गुणांची कमाई करत ने समसमान ठरल्या
तसेच विनोद कुमार दुसऱ्या सामन्यातील आजचा कुस्तीवीर म्हणजेच प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

– पहिल्या डावात ५७ वजनगटामधील सागर मारकड आणि सौरभ पाटील यांच्यातील लढत शेवटच्या क्षणापर्यंत रंजक ठरली. दोघांनी ६ गुणांची कमाई केली असली तरी पंचांनी तांत्रिक कारणास्तव मुंबई अस्त्रच्या सागरला विजयी घोषित केले.
– दुसऱ्या डावात ५५ वजनगटातील ललिता शेरावत आणि विश्रांती पाटील यांच्यात तोडीस तोड असा खेळ रंगला. यात अखेर मुंबई अस्त्रच्या ललिताने १६-१ने दमदार विजय मिळवला.
– तिसऱ्या डावात ६५ वजनगटातील तुकाराम शितोळे राहुल आवारे यांच्यात थरारक डाव बघायला मिळाला. त्यात पुणेरी उस्तादच्या राहुल आवारेने १४-० असा खणखणीत विजय मिळवला.
– चौथ्या डावात ७४ वजनगटातील रवींद्र करे (राखीव खेळाडू) विरुद्ध विनोद कुमारचा खेळ प्रेक्षणीय होता. पुणेरी उस्तादच्या विनोद कुमारने सलग १६ गुणांची कमाई करत दणदणीत विजय मिळवला.
– पाचव्या डावात ८६ वजनगटातील संजय सुळ आणि हनुमंत पुरी या दोन्ही कुस्तीगीरांना दमदार एन्ट्री घेत पुढे उत्कंठावर्धक खेळी दर्शवली. या तुल्यबळांमध्ये अखेर मुंबई अस्त्रच्या संजयने ६-३ने बाजी मारली.
– पहिल्या दिवसातील शेवटच्या आणि दुसऱ्या सामन्यातील सहावा डाव ८६+ वजनगटातील अक्षय शिंदे विरुद्ध विजय चौधरी यांच्यात रंगला. ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणाऱ्या पुणेरी उस्तादचा विजय चौधरी यांनी हा डावही ५-४ ने जिंकला.

मुंबई अस्त्र आणि पुणेरी उस्ताद या दोन्ही संघांत बरोबरीचा सामना झाल्याने दोघांना आजचा शानदार खेळ म्हणजेच फँटास्टिक फाइट ऑफ द डेचा किताब बहाल करण्यात आला. मुंबई अस्त्रचा कॅप्टन रणजीत नलावडे आणि पुणेरी उस्तादचा कॅप्टन राहुल आवारे यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.