नेमांजा मॅटिकची मँचेस्टर सोबत नवीन सुरवात

या वर्षीचा समर ट्रान्सफर हा फुटबॉल विश्वात खूप चर्चेचा विषय होतो आहे. नेमारसाठी पॅरिस सेंट जर्मन हा संघ तब्बल २२२ मिलियन पाउंड रक्कम देण्यास तयार आहे. ही रक्कम आजवरची सर्वाधिक ट्रान्सफर अमाऊंट ठरेल. मँचेस्टर युनाइटेड संघ फुटबॉलमध्ये त्यांचे साम्राज्य परत स्थापन करण्याच्या हेतूने खेळाडूंशी करार करत आहे. मँचेस्टरने आज नेमांजा मॅटिक चेल्सीच्या खेळाडूला करारबद्ध केले आहे.

सर्बियाचा हा २८ वर्षीय खेळाडू मँचेस्टरच्या समर ट्रान्सफर विंडोमधील मुख्य टार्गेट मधील एक खेळाडू होता. मॅटिकला मँचेस्टरने ४० मिलियन पाउंड इतकी मोठी रक्कम देऊन मँचेस्टर संघासाठी करारबद्ध केले आहे. आता मँचेस्टरची मिडफिल्ड मधील ताकद वाढण्यासाठी खूप मदत होणार आहे. मँचेस्टरकडे मिडफिल्ड मध्ये पॉल पोग्बा, जुआन माटा, अँडर हेरेरा यासारखे स्किलफुल खेळाडू आहेत.

मँचेस्टरने या समर ट्रान्सफर विंडो मध्ये रोमेलू लुकाकू, व्हिक्टर लिंडेलॉफ, नेमांजा मॅटिक या खेळाडूला करारबद्ध केले आहे. रोमेलू लुकाकू हा मागील इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाचा दुसरा सर्वात यशस्वी स्ट्रायकर होता. त्याला एव्हरटन संघाकडून मँचेस्टरने करारबद्ध केले आहे. तर मागील दशकापासून मँचेस्टर युनाइटेडसाठी खेळणारा वेन रूनी याचा मँचेस्टरसाठीचा करार संपला असून त्याने आता एव्हरटन संघासोबत करार केला असुन तो आता एव्हरटन संघासाठी फुटबॉल खेळत राहील.