Premier League: मॅन्चेस्टर सिटीची प्रिमियर लीगमधील स्वप्नवत सफर

प्रिमियर लीग मध्ये आज प्रत्येक संघाला धाक बसलाय तो मॅन्चेस्टर सिटीचा असे आपण कालच्या सामन्यानंतर नक्कीच बोलू शकतो. लीगचे प्रत्येक संघाचे १९ सामने झालेत आणि लीग बरोबर अर्धी संपली असतानाच विजेता संघ जवळजवळ स्पष्ट झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

१९ सामन्यात १८ सामने जिंकत ५५ गुणांसह पेप गार्डिओलाची मॅन्चेस्टर सिटी पहिल्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या स्थानावरील मॅन्चेस्टर युनाएटेडपेक्षा थोडेथोडके नाही तर तब्बल १३ गुणांच्या फरकाने घेतलेली ही आघाडी सिटीला नक्कीच या वर्षीच्या प्रिमियर लीगवर आपले नाव कोरण्यास मदत करेल.

काल झालेल्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर बाॅर्नेमाॅथचा ४-० ने पराभव करत सिटीने सलग १७ वा विजय नोंदवला. मागील ८ महिन्यात सिटीने एक पण प्रिमियर लीगचा सामना गमावला नाही. काल सिटी तर्फे ॲगुवारोने २ तर डॅनिलो आणिस्टर्लिंगने प्रत्येकी १-१ गोल नोंदवला. ॲगुवारो आणि स्टर्लिंगने प्रत्येकी १-२ गोलला असिस्ट सुद्धा केले.

पहिल्या हाफ मध्ये २७ व्या मिनिटला बाॅर्नेमाॅथच्या गोलकिपरच्या चुकीमुळे सिटीने बाॅलवर ताबा मिळवला आणि फर्नडिन्होच्यापासवर ॲगुवारोने हेडर मारत सिटी साठी पहिला गोल केला. हा ॲगुवारोचा सिटीच्या घरच्या मैदानावर १०० वा गोल होता. सिटीसाठी ७९ व्या मिनिटला तिसरा आणि ॲगुवारोचा दूसरा गोल पण हेडरच होता. प्रिमियर लीगच्या एकाच सामन्यात हेडरने दोनगोल करायची ॲगुवारोची ही पहिलीच वेळ होती.

या मौसमातील ११ मधुन ७ गोल्स शेवटच्या १० मिनिटात करणार्या स्टर्लिंगने सामन्याच्या ५३ व्या मिनिटला ॲगुवारोच्यापासला उजव्या कोपर्यातुन मारत सिटीचा दूसरा आणि आपला १२ वा गोल केला. शेवटच्या मिनिटात गोल साठी प्रसिद्ध झालेल्या स्टर्लिंगने बाॅल आपल्या ताब्यात घेत बदली खेळाडू म्हणुन आलेल्या डिफेंडर डॅनिलोकडे दिला आणि त्याने त्याचे गोल मध्ये रुपांतर करत सिटी साठी आपला पहिला गोल नोंदवला तर स्टर्लिंगने आपल्या नावे एक असिस्ट नोंदवला.

# सिटीने २०१७ वर्षात १००+ गोल्स करत १९८२ च्या लीवरपुलच्या १०६ गोल्स नंतर असा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला.

# या मौसमात युरोपच्या टाॅप ५ लीग मध्ये अपराजित राहणार्या २ संघांमधून मॅन्चेस्टर सिटी हा १ संघ आहे.

# युरोपच्या टाॅप ५ लीगमध्ये सर्वाधिक सामने लागोपाठ जिंकायच्या यादीत सिटी १७ विजयासह दूसर्या स्थानावर आहे तर२०१३-१४ च्या १९ विजयासह बायर्न म्युनिच पहिल्या स्थानी आहे. विशेष म्हणजे तेव्हा पण बायर्नचा मॅनेजर पेप गार्डिओलाच होता.

# आपल्या घरच्या मैदानावर या वर्षी सिटीने एक पण सामना गमावला नाही. झालेल्या २६ सामन्यात २१ विजय तर ५ सामने बरोबरीत सुटले.