Premier League: मॅन्चेस्टर सिटीचे वर्चस्व कायम, विजेतेपदाची दावेदारी केली आणखी भक्कम

प्रिमियर लीग जशी जशी पुढे सरकते आहे तसे या वर्षी कोणता संघ विजेतेपद पटकवणार ते स्पष्ट होत आहे. लीगच्या पहिल्या सामन्यापासूनच आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या मॅन्चेस्टर सिटीने काल ५-१ ने विजय मिळवला. २७ सामन्यात २३ विजय १ पराभव तर ३ सामने बरोबरीत राखत ७२ गुणांसह आपले प्रथम स्थान अधिक मजबूत केले.

घरच्या मैदानावरील या विजयासह मॅन्चेस्टर सिटीने घरच्या मैदानावर डिसेंबर २०१६ पासून झालेल्या २६ सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले नाही आणि या बरोबरच चेल्सीच्या याच विक्रमाची बरोबरी केली. सिटीने घरच्या मैदानावर २६ सामन्यात २१ विजय मिळवले तर ५ सामने बरोबरीत सोडवले आहेत.

काल झालेल्या लिसिस्टर सिटी बरोबरच्या सामन्यात अवघ्या ३ मिनिटात डी ब्रूनेच्या क्राॅसवर रहिम स्टर्लिंगने बाॅलला फक्त दिशा दाखवत गोल केला आणि सामन्यात आघाडी घेतली. पण त्यांना ही आघाडी जास्त वेळ टिकवता आली नाही वार्डीने ३ डिफेंडर्सला चकवत २४ व्या मिनिटला गोल केला आणि सामना १-१ ने बरोबरीत आणला.

एकाच मोसमात मॅन्चेस्टर सिटी, युनाएटेड, लीवरपुल, चेल्सी, स्पर्स आणि अर्सेनल विरुद्ध गोल करणारा वार्डी पहिला खेळाडू ठरला. पहिल्या हाफच्या शेवट पर्यंत सामना १-१ ने बरोबरीत राहीला.

दुसऱ्या हाफच्या ३ मिनिटानंतर पुन्हा एकदा डी ब्रूनेच्याच असिस्टने ॲगुवारोने गोल करत सामन्यात २-१ ने आघाडी मिळवून दिली. या गोल बरोबरच घरच्या मैदानावर पहिल्यांदाच लागोपाठ ७ सामन्यात ॲगुवारोने गोल्स केले.

यात २ हॅट्रिकचा सुद्धा समावेश आहे. ५ मिनिटाच्या अंतराने या जोडीने पुन्हा गोल करत सामन्यात सिटीने ३-१ ची आघाडी मिळवली. या गोल बरोबरच डी ब्रूनेची असिस्टची हॅट्रिक झाली.

या मोसमात युरोपच्या ५ सर्वोत्तम लीग मध्ये डी ब्रूनेचे सर्वाधिक १४ तर नेमारचे ११ आणि मेस्सीचे १० असिस्ट आहेत. डी ब्रूनेच्या २०१२ मधील पदार्पणापासून युरोप मध्ये सर्वाधिक ७७ असिस्ट आहेत तर मेस्सीचे ७६.

७७ व्या मिनिटाला लिसिस्टरच्या गोलकीपर कडून बाॅल मारताना झालेल्या चुकीचा फायदा घेत ॲगुवारोने हॅट्रिक नोंदवली. ॲगुवारो प्रिमियर लीगमध्ये ८ हॅट्रिक करत ॲलनच्या ११ हॅट्रिकच्या विक्रमाच्या एक पाऊल जवळ पोहचला.

९० व्या मिनिटाला सामन्यातला पाचवा गोल झाला. ॲगुवारोने पेनल्टी बाॅक्स बाहेरून मारलेला बाॅल क्राॅसबारला लागत गोलपोस्ट मध्ये गेला. या गोल बरोबरच ॲगुवारोने एकाच सामन्यात ४ किंवा त्यापेक्षा अधिक गोल्सची कामगिरी ३ वेळा करत प्रिमियरमध्ये विक्रम केला.

दुसऱ्या महत्वपूर्ण सामन्यात टोट्टेन्हम हाॅटस्परने अर्सेनलचा १-० ने पराभव केला. सामन्यातील एकमेव गोल हॅरी केनने केला.