या खेळाडूने केले भारताकडून अंतिम सामन्यात अर्धशतक

कर्णधार पृथ्वी शॉने अंतिम सामन्यात निराशा केल्यांनतर सलामीवीर मनजोत कार्लाने मात्र संयमाने फलंदाजी करत ४९ चेंडूत ५१ धावा तडकावल्या आहेत. त्याला तेवढीच चांगली साथ पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिलने दिली आहे.

मनजोत कार्लाने ह्या विश्वचषकातील हे दुसरे अर्धशतक केले असून त्याचे एक अर्धशतक हे ३ धावांनी हुकले होते.

शुभमन सध्या १९ चेंडूत २६ धावांवर खेळत असून भारतीय संघाने १८ षटकांत १ बाद ११६ धावा केल्या आहेत. ३२ षटकांत संघाला जिंकायला १०१ धावांची गरज आहे. बाद झालेल्या कर्णधार पृथ्वी शॉने ४१ चेंडूत २९ धावा केल्या आहेत.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ५० षटकात २१७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.ऑस्ट्रेलियाने सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांची सुरवात अडखळत झाली. भारताचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेलने मॅक्स ब्रायंट(१४) आणि जॅक एडवोर्ड(२८) या दोन्ही सलामीवीरांना लवकर बाद केले. त्यानंतर लगेचच कमलेश नागरकोटीने ऑस्ट्रेलिया कर्णधार जेसन संघाला(१३) बाद केले.

या खराब सुरवातीनंतर मात्र जोनाथन मेर्लो आणि परम उपाल(३४) यांनी डाव सावरत ७५ धावांची भागीदारी रचली. जोनाथनने १०२ चेंडूत ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला उपाल बाद झाल्यावर नॅथन मॅक्स्विन्नीनेही(२३) चांगली साथ दिली होती. पण पुन्हा एकदा शेवटच्या काही षटकात ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजांना विशेष काही करता न आल्याने त्यांनी नियमित अंतराने बळी गमावले.

भारताकडून ईशान पोरेल(२/३०), कमलेश नागरकोटी(२/४१), शिवा सिंग(२/३६), शिवम मावी(१/४६) आणि अनुकूल रॉय(२/३२) यांनी बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव ४७.२ षटकात २१६ धावांवर संपुष्टात आणला.