बेल्जियम ज्युनियर कॅडेट ओपन स्पर्धेत मनुष, रिगनला कांस्यपदक 

बेल्जियम: भारताचे युवा खेळाडू मनुष शाह आणि रिगन अल्बुक्युरेक्यु यांनी बेल्जियम ज्युनियर व कॅडेट ओपन  टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. ही स्पर्धा आयटीटीएफ ज्युनियर सर्किट प्रिमियमचा भाग आहे. हे दोघेही जण इराणच्या अमिन अहमदीन आणि रादीन खय्याम सोबत जोडी बनवून मुलांच्या ज्युनियर सांघिक गटात खेळत होते. 
   
भारत व इराणच्या या जोडीला स्थानिक अ‍ॅड्रिअन रासेनफोस, निकोलस डेग्रोस आणि ओलाव कोसोलोस्कीविरुद्ध फारशी चमक दाखवता आली नाही.इराणच्या अमिन अहमदीनला (0-3) अ‍ॅड्रियनने पहिल्या सामन्यात पराभूत केले. पण, मनुष शाहने ओलाव कोसोलोस्कीला 3-1 अशा फरकाने पराभूत करत आगेकूच केले.
 
रिगन अल्बुक्युरेक्युला निकोलस डेग्रोसने चुरशीच्या लढतीत 1-3 अशा फरकाने पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 21 व्या स्थानी असलेल्या (18 वर्षाखालील) मनुषने अ‍ॅड्रिअन रासेनफोसवर 3-1 अशा फरकाने विजय नोंदवला. यानंतर इराणच्या अमिनने ओलावला 3-2 असे नमवित उपांत्यफेरीत धडक मारली.
 
उपांत्यफेरीत भारत व इराण यांच्या मिश्रित संघाचा सामना जपानच्या रोईछी योशियामा आणि ताकेरु काशिवा सोबत न्युझीलंडच्या नॅथन जू सोबत होता. यामध्ये इंडो- इराणियन संघाला 0-3 असे पराभूत व्हावे लागल्याने त्याने कांस्यपदकाची कमाई केली. मुलींच्या ज्युनियर सांघिक गटात मनुश्री पाटील, स्वस्तिका घोष व ग्वाटेमालाच्या लुशिया कोर्डेरो यांचा चीन तैपेईच्या संघासमोर निभाव लागला नाही व उपांत्यपुर्व फेरीत त्यांना पराभूत व्हावे लागले.