Australian Open 2018: मारिन चिलीच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत

मेलबर्न । ऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या पुरुष एकेरीत क्रोशियाच्या मारिन चिलीचने अंतिम फेरी गाठली आहे. त्याने काईल एडमंडचा उपांत्य फेरीत सरळ सेटमध्ये ६-२, ७-६, ६-२ असा पराभव केला आहे.

हा सामना २ तास १८ मिनिटे चालला. चिलीचला स्पर्धेत ६वे मानांकन होते तर एडमंड हा ब्रिटनचा बिगरमानांकीत खेळाडू होता. तो सध्या एटीपी क्रमवारीत ४५व्या स्थानी आहे.

ओपन इरामध्ये (१९६८) पासून ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठणारा केवळ चौथा ब्रिटिश खेळाडू होण्याचे काईल एडमंड स्वप्न मात्र यामुळे भंगले आहे.परंतु तो ४९व्या क्रमवारीवरून थेट २५व्या स्थानावर झेप घेऊ शकतो.

तर दुसऱ्या बाजूला मारिन चिलीच आपल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याला आता रविवारी रॉजर फेडरर आणि दक्षिण कोरियाच्या चुंग यांच्यातील विजेत्याशी दोन हात करावे लागणार आहे.

२०१४ मध्ये अमेरिकन ओपनचा विजेता ठरलेल्या चिलीचने सामन्यात एडमंडला संधीच दिली नाही. पहिल्या सेटनंतर एडमंडने तब्बल ७ मिनिटांचा मेडिकल टाइम आऊट घेतला होता.

चिलीच २०१७मध्ये विम्बल्डन, २०१४मध्ये अमेरिकन ओपन आणि आता २०१८मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आज त्याचा ग्रँडस्लॅम मधील ५वा उपांत्यफेरीचा सामना होता.

यावर्षीच्या सुरुवातीला पुण्यात झालेल्या महाराष्ट्र ओपन स्पर्धेत चिलीच उपांत्य फेरीतूनच बाहेर पडला होता. परंतु केवळ दोन आठवड्यात जबरदस्त कमबॅक करत त्याने ह्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.