मार्टिना हिंगीस करणार तिसऱ्यांदा टेनिसला अलविदा

स्विझर्लंडची टेनिसपटू मार्टिना हिंगीस या आठवड्यात होणाऱ्या वीमेन्स टेनिस असोसिएशन (डब्लूटीए) अंतिम स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे तिने सांगितले आहे. २३ वर्षांच्या तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ती तिसऱ्यांदा पण शेवटची निवृत्ती घेत असल्याचे ती म्हणाली.

सध्या दुहेरीच्या क्रमवारीत ती अव्वल क्रमांकावर आहे. तिने आत्तापर्यंत २५ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यात ५ एकेरी, ७ मिश्र दुहेरीत तर १३ महिला दुहेरीत असे एकूण २५ ग्रँडस्लॅम तिच्या नावावर आहेत.

११९४ ला तिने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये प्रवेश केला होता. परंतु नंतर २००३ ला तिला दुखापतींनी सतावले त्यामुळे तिने पहिल्यांदा तिची निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर तिने २००६ ला पुनरागमन करताना दुहेरीवर लक्ष केंद्रित केले. यानंतर एकाच वर्षात विम्बल्डन २००७ मध्ये ड्रग्स घेतल्याच्या आरोपामुळे पुन्हा एकदा तिला टेनिसपासून दूर जावे लागले. तिने २०१० ला पुन्हा पुनरागमन केले.

मार्टिना आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या जोडीने महिला दुहेरीत विजयाचा धडाका लावताना सलग १६ महिने अपराजित राहण्याचा विक्रम केला. टेनिस इतिहासात उत्कृष्ट महिला दुहेरी जोडींपैकी यांची जोडी ठरली. त्यांनी विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन, अमेरिकन ओपन जिंकताना सलग ४१ सामने जिंकले तसेच ९ डब्लूटीए विजेतीपद मिळवली. यांची जोडी ‘सॅन्टिना’ म्हणून ओळखली जाते.

मार्टिना हिंगिसने आता मात्र टेनिसमधून थांबण्याचा निर्णय घेताना सांगितले आहे की ती टेनिसपासून दूर राहू शकत नाही. त्याचबरोबर ती म्हणाली मी आता माझ्यापुढे कोणत्या संधी आणि आव्हाने येतील हे बघेन. माझा विश्वास आहे की अजूनही माझ्यातले सर्वोत्तम येणे बाकी आहे आणि माझा अनुभव मी तुम्हाला सांगत राहीन. तसेच तिने तिच्या आईसह सर्वांचे आभार मानले आहेत.

स्विझर्लंडचाच टेनिसपटू रॉजर फेडरर मार्टिना बद्दल म्हणाला “टेनिस काय आहे हे शिकवण्यात तिचासुद्धा हातभार आहे. मला तिच्या निवृत्तीचे वाईट वाटत नाही. ती बऱ्याच काळापासून खेळत आहे. मी तिचा चाहता होतो आणि कायमच असेन”