वाढदिवस विशेष: सचिन आणि पाकिस्तान…

भारतातील मुंबई शहरातील १६ वर्षाचा लहान मुलगा पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचा सामना कसा करणार हा प्रश्न सर्व भारतीय क्रिकेट रसिकांना पडला होता.

१९८९ मध्ये जेव्हा सचिनने भारतासाठी पाकिस्तान विरुद्ध कसोटी खेळली तेव्हा तो भारताकडून कसोटी खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनला. आजही हा विक्रम सचिनच्याच नावावर आहे.

सचिनने पाकिस्तानविरुद्ध खेळल्या १८ कसोटी सामन्याच्या २७ डावात ४२ च्या सरासरीने १०५७ धावा केल्या आहेत त्यात त्याने २ शतक आणि ७ अर्धशतके ठोकली आहेत.

मुलतानमधील कसोटी सामन्यात १९४ धावा करत त्याने पाकिस्तान विरुद्धची वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या केली. सचिनला पाकिस्तान विरुद्धच्या १९९९ च्या चेन्नई मधील कसोटी सामन्यात त्याच्या १३६ धावांच्या कामगिरीसाठी सामनावीरचा किताब दिला गेला होता.

सचिन, विश्वचषक, पाकिस्तान ,शोहेब अख्तर या सर्व गोष्टी एकत्र जोडल्या की एक व्हिडिओ डोळ्या समोर येतो तो म्हणजे सचिनने अख्तरच्या बाउन्सरला पॉईंटवर मारलेला षटकार.२००३च्या विश्वचषकाच्या या आठवणी एक भारतीय क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाही.

आजपर्यंत भारत कधीच विश्वचषकामध्ये पाकिस्तान बरोबर हरला नाही याचे एक प्रमुख कारण सचिन आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना सचिनने ६९ सामन्यांच्या ६७ डावात २५२६ धावा केल्या, त्यात १६ अर्धशतके आणि ५ शतकांचा समावेश आहे. सचिनची एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध ४० ची सरासरी आहे.

२००४ मध्ये झालेल्या रावळपिंडी येथील एकदिवसीय सामन्यांमध्ये १४१ धावा करत सचिनने पाकिस्तान विरुद्धची वैयक्तिक सर्वात मोठी खेळी केली. सचिनला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांमध्ये ७ सामनावीरचे किताब मिळाले आहेत. एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान हा सचिनच्या सर्वाधिक धावा केलेल्या संघाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जेव्हा भारत पाकिस्तान सामने होतात तेव्हा आजही सचिन आणि अख्तर मधील लढतीची आठवण येत हे नक्की.

लेखक- आकाश खराडे
(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)