अनंत, अद्भुत ,विराट आणि विशाल ‘सचिन रमेश तेंडुलकर’

क्रिकेटच्या आकाशगंगेत असंख्य तारे चमकले आणि विझलेत, अनेक खेळाडू उदयास आलेत आणि नाहीसे झालेत पण काळाच्या ओघात गेली अनेक वर्षे आपले निर्विवाद वर्चस्व टिकवुन ठेवणारा क्रिकेटचा देव आजच्या दिवशीच जन्मला होता. क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्वोत्तम खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. भारतीय क्रिकेटचा आत्मा म्हणजे सचिन तेंडुलकर, आमच्यासारख्या असंख्य लोकांना क्रिकेटच वेड लावणारा सचिन तेंडुलकर, या विश्वातला सर्वोत्तम फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर.पद्मविभूषण, राजीव गांधी खेलरत्‍न आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळवणारा एकमेव क्रिकेटर म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेटमधले पहिले द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर,शतंकाच महाशतक करणारा सचिन तेंडुलकर.

सचिनने आजवर अनेक विक्रम ध्वस्त केले तर अनेक नवे विक्रमही प्रस्थपितही केले. हजारो धावा ,अनेक विक्रमांची तोडफोड आणि पुनर्बांधणी करत या महान खेळाडूने अनेक वर्षे क्रिकेटची जी सेवा केलीय त्याला तोड नाहीय. भारतात क्रिकेट हे सचिन या नावाशिवाय पूर्णत्वास येत नाही आणि येऊही शकणार नाही. सचिन मैदानावर एक फलंदाज म्हणून महारथी कर्णाच्या बणाप्रमाणे विध्वंसक होताच तसा तो खेळाडू म्हणून श्री कृष्णाच्या वाणीप्रमाणे शांत आणि संयमी स्वभावाचा देखील होता. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली पण कधीही त्याच्यातला ‘अहंकारी देव’ बाहेर आला नाही. आला तो फक्त नम्र, मृदूभाषी, शांत आणि संयमी मराठामोळा सचिन तेंडुलकरच.

भारतात जन्मलेला प्रत्येक मुलगा मला सचिन तेंडुलकर बनायचयं हे स्वप्न पाहत मोठा होतो. शतक केल्यानंतर तुझं ते आकाशात पाहुन हेल्मेटवरच्या तिरंग्याचे आपल्या ओठांनी चुबंन घेणं कोणीच विसरु शकणार नाही. तुला क्रिकेट सोडून आता पाच वर्षे होत आलीत मात्र आजही आम्ही तुला क्रिकेटच्या मैदानात शोधत असतो. तुझ्या खेळाने जी क्रिकेटविश्वावर मोहिनी घातलीय ती कधीच न उतरणारी आहे. एकवेळ नदी आपली चाल बदलेल, सुर्य पश्चिमेकडून उगवेल पण सचिन आपला नम्र स्वभाव कधी सोडणार नाहि. तुज्या या अनंत, अद्भुत ,विराट आणि विशाल रुपाला तु कधीही अहंकाराचा लवलेशही येऊ दिला नाहिस. यातच तुज देवत्व सिध्द झालंय. अशा या क्रिकेटच्या देवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

-सचिन अमुणेकर