वाढदिवस विशेष: वानखेडेला जेव्हा जाग येते.. 

-पराग पुजारी

वानखेडेला जेव्हा जाग येते…

तेव्हा हाका जातात शिवाजी पार्क आणि डी वाय पाटलांनाही
सामूहिकरीत्या अस्वस्थ होतात तेही आणि आम्हीही

वानखेडेला जेव्हा जाग येते…
तेव्हा दिसतात त्याला आपल्या अंगाखांद्यावर क्रिकेट खेळणारी पोरंटोरं
त्यांचे प्रशिक्षक शिकवत असतात त्यांना – कसं जावं गोलंदाजांना सामोरं
गर्दीत अनेक खेळतात कांबळी आगरकर शर्मा रहाणे
प्रत्येकाचाच नशिबी देशासाठी खेळायाची वाट पहाणे
बेंट हातात धरायला लागल्यापासून एकच स्वप्न असते
पुढच्या सेकंदापासून सचिन तेंडुलकर व्हायचे असते

वानखेडेला जेव्हा जाग येते…
तेव्हा आपसूक जागतात त्याच्याही आठवणी – अविस्मरणीय वर्ल्डकप सामन्यांच्या
जिथे गाजतात सध्या गल्ल्लाभरू आयपीएल सामने- खिशास कात्री लावून सामान्यांच्या
खरे क्रिकेट कसोटी क्रिकेट , तीन तास नव्हे पाच दिवस टिकवा विकेट
कळकळीनं ओरडून सांगत असतातही एखादे रमाकांत आचरेकर
दुर्लक्ष करतात आचरट – पुढच्या सेकंदास व्हायला निघालेले तेंडुलकर

वानखेडेला जेव्हा जाग येते…
तेव्हा तरळतात त्याच्याही मातकट डोळ्यांसमोरून २३ वर्ष
१९८९ पासूनचे हतबल गोलंदाज पाहून होतो त्यालाही हर्ष
खरंच आता ते दिवस राहिले नाहीत, पुढे काय होणार काय माहीत
पण नंबर १० जर्सीवाला तो ‘देव’ पुन्हा मैदानात खेळताना तरी प्रेक्षक पाहणार नाहीत

वानखेडेला जेव्हा जाग येते…
तेव्हा पहावे लागले अलीकडे त्याला स्टेडियममधले रिकामे रकाने
प्रेक्षकांचं म्हणणं अगदीच साधंसोपं – सचिनच नाही तर कसले सामने
आकडे काय विक्रम काय – सचिनसमोर क्षुल्लक ठरले
टीव्हीचे बिल खासे वाढले पण डोळ्यांचे मात्र पारणे फिटले
असं नाही की गुणी खेळाडूंची आज वानवा आहे
पण सचिनशिवाय क्रिकेट ही एक निव्वळ अफवा आहे
क्रिकेट धर्मावर आमची भक्ती श्रद्धा आजही आहे
पण सचिनशिवाय क्रिकेट ही २४ केंरेट अंधश्रद्धा आहे
२४ एप्रिल दरवर्षी येईल, प्रत्येकजण सचिनला विश करेल
पण २४ एप्रिल १९९८ – शारजा शतक कोण विसरेल

वानखेडेला जेव्हा जाग येते…
तेव्हा आठवतंच त्यालाही हे सारं
डोळे होतात चिंब त्याचे वाहतं मंद वारं
आणि आयपीएलचे कमर्शियली भुकेले वीर विचारतात क्युरेटरला
पाउस पडला नाही तरी मैदान ओलं कसं झालं ?

वानखेडेला जेव्हा जाग येते…
तेव्हा जाणवतं त्यालाही गावसकरनंतर तेंडुलकर आलाच की
आता तेंडुलकर नंतर कोण
मग गरज होते निर्माण – कालचक्रे फिरण्याची
संघाला पुन्हा एखादा सचिन मिळण्याची
देवाचे भक्त जणू तयारच – त्या त्या घरातल्या पुढच्या पिढीतला देव पाहण्यासाठी
तेव्हा अर्जुन करतो आटोकाट प्रयत्न – आरशात पाहता त्याला रोहन न दिसण्यासाठी
मग मात्र गतरम्यतेत हरवलेल्या वानखेडेला खडबडून जाग येते
आणि आकळते त्याला आपणच आहोत भूमी असा चमत्कार घडण्याची
आणि मग मात्र वानखेडे जागेच राहते…….

“सचिन स्तोत्र”

‘त्या’ची वेगळ्याने ओळख करून द्यायची गरज नाही. C फॉर क्रिकेट असा C ब्लड ग्रुप असलेल्या आमच्यासारख्या अनेकांसाठी क्रिकेट हा धर्म आणि तो म्हणजे देव. आज त्याच्या ४५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सचिनचा क्रिकेटप्रवास उलगडून दाखवणारे हे ‘सचिन स्तोत्र’ सादर करतो आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल. हे गाणं आहे आपल्या लाडक्या सचिन रमेश तेंडुलकरला एक ट्रिब्यूट. सोबत लिंक दिलेली आहे. नक्की तुमचा प्रतिसाद द्या.
सचिन स्तोत्र या आमच्या यूट्यूब गाण्याची लिंक –