वाढदिवस विशेष: सचिन आता तरी थांब!!

-आदित्य गुंड

आज तुझा वाढदिवस. सगळेच तुला शुभेच्छा देणार. या सगळ्या गदारोळात माझंही शुभेच्छारुपी गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न करतोय.

तू मला आठवतोस तो ९६ च्या वर्ल्ड कपमधला. तोपर्यंत माझं क्रिकेट कळण्याचं वयही झालं होतं. त्या वर्ल्डकपला आपण सेमी फायनलला बाहेर पडलो तरीही तुझ्या नावावर सगळ्यात जास्त धावा होत्या. त्या सुमारास तू भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ होऊ लागला होतास.

तू आऊट झाला तर मॅच बघूच नये असं मला वाटायचं. माझे दादाही कित्येकदा तू आऊट झाला की आतमध्ये जाऊन पुस्तक वाचत बसायचे. दरम्यान माझ्यासाठी तू तेंडुलकरचा ‘तेंडल्या’ झाला होतास. माझ्याबरोबरच माझ्या पिढीचे कित्येकजण मित्र असल्यासारखे तुला तेंडल्या म्हणायला लागले होते.

शारजामध्ये तू ऑस्ट्रेलियाची काय पिसं काढली होतीस! वेडे झालो होतो रे आम्ही. त्यावेळेचे हायलाईट्स आजही पाहिले तरी अंगावर काटा येतो. त्या मॅचला टोनी ग्रेगची कॉमेंट्री आठवून आता असं वाटतं की तू त्याला खुर्चीत उभं रहायला नक्की भाग पाडलं असशील.

इंग्लंडच्या वर्ल्डकपला तुझे वडील गेले. त्यानंतर केनियाविरुद्ध तू जेव्हा शतक करून आकाशाकडे पाहिलं तेव्हा तुझ्याबरोबर आमच्यासारख्या अनेकांचे डोळे भरून आले होते. “काय खेळलाय राव सचिन. ही खरी वडिलांना श्रद्धांजली.” अशी वाक्य गल्लोगल्ली कानावर पडली होती. आता अशा सगळ्या मॅचेसमधली बॅटिंग सांगायची झाली तर जागा कमी पडेल.

तू खेळत राहिलास आणि धावा करत राहिलास. थोड्या नाही तर पोत्याने. आत्तापर्यंत कौतुक वाटायचं तुझ्याबद्दल. आता आदर वाटू लागला होता. तुझ्यासमोर भलेभले रेकॉर्ड्स खुजे वाटू लागले होते. आत्तापर्यंत तुला तेंडल्या म्हणणारे आम्ही आता तुझा उल्लेख ‘गॉड’ असा करू लागलो होतो. एखाद्या मॅचला तू खेळला नाहीस तर तुझ्यावर टीका करणाऱ्यांना तू किती भारी आहेस? तुझा स्ट्रेट ड्राइव्ह किती बाप आहे? याबद्दल आम्ही लेक्चर द्यायचो.

एकदिवसीय क्रिकेटमधले पहिले द्विशतक करून तू फलंदाजीचा देव का आहेस हे दाखवून दिलंस. तुझं द्विशतक झाल्यानंतर विक्रम साठेने सुनंदन लेलेंना मेसेज पाठवला होता. ”सचिन खेळत असलेल्या जमान्यात मला जन्माला घातलं म्हणून मी माझ्या आई वडीलांचा जाहीर सत्कार करणार आहे.” खरं सांगू? माझ्या पिढीच्या सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या मनात तेव्हा याच भावना होत्या.

मी तुला नुसतंच खेळताना नाही पाहिलंय तर तुला जगातला सर्वोत्तम स्ट्रेट ड्राइव्ह मारताना पाहिलंय, वनडेमध्ये २०० करताना पाहिलं आहे, १०० वं शतक करताना पाहिलं आहे, शेन वॉर्नला चोपताना पाहिलं आहे, वसिम अक्रम, शोएब अख्तर, वकार युनूसच्या चिंधड्या करताना पाहिलं आहे, ब्रेट लीला अप्पर कटचा सिक्स मारताना पाहिलेलं आहे. किती ती नजाकतीने भरलेली फलंदाजी. मी ती पाहिली आहे. इथून पुढच्या पिढ्या हे सगळं युट्यूबवर पाहतील, पण मी मात्र हे विक्रम याची देही याची डोळा पाहिलेले आहेत.

आपण २०११ चा वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा तू लहान मुलासारखा रडला होतास. तुझ्या डोळ्यात पाणी बघून कित्येकजणांना रडू आले असेल. २०१३ ला जेव्हा तू निवृत्त झालास तेव्हा मी खूप भावुक होतो. फेसबुकवर सगळेच लोक काही ना काही लिहीत होते. आपण काही लिहायचं नाही असं मी ठरवलं होतं. अचानक तू खेळपट्टीकडे गेलास आणि तिला वंदन केलंस.

त्या क्षणी मी फेसबुकवर तुला सलाम म्हणून स्टेटस टाकलं होतं. त्या एका कृतीने तुझ्याबद्दलचा आदर शेकडो पटींनी वाढला. नंतरच्या तुझ्या भाषणाने तर कित्येकांना रडवले. मी घरी एकटाच होतो त्यामुळे मनसोक्त रडलो होतो. नंतर क्रिकेट खेळायला गेलो तेव्हा माझ्या अनेक मित्रांनी आपणही मनसोक्त रडल्याचं न लाजता कबूल केलं होतं. आपल्या बॅटिंगने कित्येकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या तू आपल्या भाषणानं मात्र कित्येकांना रडवलं होतंस.

खेळाच्या मैदानावर सगळ्यांना हवाहवासा असणारा तू मैदानाबाहेर मात्र तुझ्या एका निर्णयामुळे टीकेचा धनी झालास. २०१२ ला तू खासदार झालास. मुळात या निर्णयावरून तुझ्यावर बरीच टीका झाली होती. खासदार झाल्यानंतर तुझ्या राज्यसभेतल्या उपस्थितीवरून तुझ्यावर अजून जास्त टीका झाली. मैदानावर आपल्या फलंदाजीने टीकाकारांची तोंडे बंद करणाऱ्या तुला मैदानाबाहेर मात्र हे जमले नाही. त्याला कारणही तसेच होते.

तुझी राज्यसभेतली उपस्थिती अतिशय सुमार होती. या टीकेनंतर मात्र तुझ्याकडून बऱ्याच सुधारणा झाल्याचे वाचनात आले. अनेक प्रश्नांसंबंधी तू मंत्र्यांना पत्रे लिहिलीस, खासदार निधी जवळजवळ ९८ टक्के वापरलास, तुझा ६ वर्षांचा पगार पंतप्रधान निधीमध्ये दान केलास. माझ्या मते ही नंतरची मलमपट्टी झाली. राज्यसभेत तुझं पहिलं भाषण तुला पूर्ण करता आलं नाही तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरची असहाय्यता आम्हालासुद्धा दिसली होती.

एक ‘माणूस’ म्हणून,खासदार न होता तू अगोदरही बरेच उपक्रम राबवत होतासच. खासदार होऊन त्यात फरक तर पडला नाहीच उलट तुझी नाचक्की झाली. एक चाहता म्हणून तुझा हा निर्णय मला कधीच पटला नाही आणि पटणारही नाही. माझी खात्री आहे की माझ्यासारख्या अनेक चाहत्यांचीदेखील हीच भावना असेल. क्रिकेटसारखा सभ्य गृहस्थांचा खेळ खेळणाऱ्या सचिनने राजकरणासारख्या मलीन क्षेत्रात यायलाच नको होते असेच आम्हा चाहत्यांचे विचार होते. अर्थात निर्णय तुझा होता.

तुझ्या निवृत्त होण्यावरूनही बराच गदारोळ झाला होता. अनेक वाहिन्यांनी सचिनने निवृत्त व्हावे अथवा नाही या विषयवार चर्चा करून आपल्या पोळ्या भाजून घेतल्या होत्या. अगदी बीसीसीआयने देखील तुझा शेवटचा सामना भारतात व्हावा आणि त्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर व्हावे म्हणून एक मालिका आयोजित केली. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेची मालिका गुंडाळण्यात आली होती. यापाठीमागेचे अर्थकारण न समजण्याइतके लोक भोळे नव्हते.

“तेंडल्याने आता रिटायर व्हावे.” अशा चर्चा आम्हीही केल्या होत्या. तुझे चाहते म्हणून आम्हाला हे सगळं बघवत नव्हतं. निवृत्तीअगोदर तू स्वतःसाठी खेळतोस असं म्हणणाऱ्यांना तुझ्या विविध खेळ्यांची आठवण करून देऊन आम्ही तुझ्या बाजूने भांडायचो. निवृत्तीच्या निर्णयाबाबत होणाऱ्या उशिराबाबत तुझी बाजू तेवढ्याच ठामपणे आम्ही तुझे चाहतेही मांडू शकलो नाही रे.

निवृत्त झाल्यानंतर अलीकडे तू अधूनमधून जाहिरातीतून दिसत असतोस. तुझी ब्रँड व्हॅल्यू अजूनही कमी झालेली नाही. सचिन नावाभोवतीच वलय अजूनही कायम आहे. पण आता तुझ्या जाहिराती बघतो त्यावेळेस तू हे का करतोस असा प्रश्न पडतो. तुला पैशांची गरज तर निश्चित नाहीये. मग हे असे करून कुठेतरी तू स्वतःची किंमत कमी करून घेतोय की काय असे वाटत राहते. अर्थात तुझी किंमत ठरवणारा मी कोणीच नाही. पण चारचौघात बसलो असताना तुझी जाहिरात लागली तर,

“यार तेंडुलकरला कोणीतरी सांगा की आता बास झालं.”

“किती पैसा गोळा करणार अजून तेंडुलकर?”

असली वाक्ये ऐकायला येतात आणि तुझा चाहता म्हणून वाईट वाटतं. तुझ्या निवृत्तीअगोदर इकॉनॉमिक टाईम्सने तुझे व्यावसायिक करार कायम रहावेत म्हणून तू निवृत्ती लांबणीवर टाकतो आहेस अशा आशयाचा एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यात ज्या ज्या कंपन्यांच्या लोकांनी माहिती दिली होती ती खोटी होती असे कुठेच वाटत नव्हते. कुणीतरी असंही म्हटलं की तू ज्या परिस्थितीमधून वर आलास त्याची तुला जाण आहे म्हणूनच तू कोणालाच नाही म्हणत नाहीस. ह्यात जरी तथ्य असले तरी मैदानावर तुला जो आदर होता तो मैदानाबाहेर टिकवायचा असेल तर हे कुठंतरी थांबव.

तुझे एकेकाळचे सहकारी गांगुली, द्रविड, कुंबळे यांनी विविध मार्गांनी भारतीय क्रिकेटशी निगडित राहणे पसंत केले. गांगुली बंगाल क्रिकेटची धुरा वाहतोय. बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचे नेतृत्व करताना त्याने भारतीय क्रिकेटला दिशादर्शक ठरतील असे काही बदल केले.

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली १९-वर्षाखालील संघाने नुकताच विश्वचषक जिंकला. १९ वर्षाखालील संघाची जबाबदारी स्वीकारताना द्रविडने दिल्लीच्या आयपीएल संघाचा मलाईदार करार सोडून द्यायला अजिबात वेळ घेतला नाही. तू मात्र मुंबई इंडियन्स सोडली तर अजून कोणत्याही रीतीने क्रिकेटशी संबंध ठेवले नाहीयेस. तिथेही प्रशिक्षकांची कमी नाहीये हे वेगळं सांगायला नको. नाही म्हणायला अनिल कुंबळेच्या नियुक्तीमध्ये तुझी भूमिका होती. त्या निवडप्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होतेच.

निवृत्तीनंतर तुझं आत्मचरित्र आलं. किती उत्सुकतेने मी ते पुस्तक विकत घेतलं होतं. इतकंच काय माझ्या अमेरिकेतल्या एका मित्राला वाढदिवसाची भेट म्हणून इथून ते पुस्तक ऑर्डर केलं होतं. तोही तुझा निस्सीम चाहता. पुस्तक वाचून झाल्यानंतर मात्र आमचा हिरमोड झाला.

“यार मजा नही आया.” असा मेसेज माझ्या मित्राने मला पाठवला. माझीही कमीअधिक हीच भावना होती. तुझ्या बॅटिंगचा दिवाना असलेल्या जुन्नरचा माझ्या एका मित्राने पुस्तकावर दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती.

“अरे त्याने स्कोअरकार्ड टाकलेत रे पुस्तकात. लोक हे पुस्तक विकत घेणार त्याला माहित होतं. मलाही आवडतो सचिन. पण स्कोअरकार्ड!!”

आत्मचरित्रामध्ये लोकांना माहित नसलेल्या गोष्टी नव्हत्याच. मग हे सगळं लिहिण्याचा अट्टाहास कशाला? तिथेही तुला मोठा करार मिळालाच होता. हेच कमी म्हणून की काय तुझ्या आयुष्यावर चित्रपटही आला. तुझा निस्सीम चाहता असूनही मला अजूनही तो चित्रपट पहावासा वाटलेला नाही.

मध्यंतरी तू सोनू निगम बरोबर एक गाणं केलं होतंस. काय होतं ते? सचिनचे दिवस इतके वाईट चाललेत का? असा प्रश्न कित्येकांनी ते गाणं बघून विचारला होता. हे तू का केलं असशील तुझं तूच जाणो. आपले चाहते आपण केलेली प्रत्येक गोष्ट उचलून धरतील असं वाटलं का तुला? ते गाणं वाईट होतं हे फेसबुक,ट्विटर वर अनेकांनी शेअर सुद्धा केलं होतं. अर्थात ते किती वाईट आहे पाहायला त्या लिंकवर लोकांनी क्लिक करणं फक्त गरजेचं होतं. व्हिडीओ बनवणाऱ्यांना तेवढं पुरेसं होतं.

आज तुझ्या वाढदिवसही तुझा एक चाहता म्हणून तुला हेच सांगू इच्छितो की, मला मैदानावरचा सचिन आवडायचा. त्याच्या मैदानावरच्या वागण्याने तो मैदानाबाहेरही तितकाच आवडायचा. आता तू जे काही करतो आहेस ते करून माझ्यासारख्या अनेक चाहत्यांच्या मनात तुझ्याबद्दल असलेला आदर कमी करू नकोस एवढंच. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!