रहाणे कष्टाळू, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक क्रिकेटर, बर्थडे बाॅय रहाणेला सचिनच्या खास शुभेच्छा

भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे आज त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मिडियावरुन रहाणेला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने शुभेच्छा देताना ट्विटमध्ये म्हटले आहे की ” मला भेटलेल्या क्रिकेटपटूंपैकी कष्टाळू, शिस्त असलेल्या आणि प्रामाणिक असणाऱ्या क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तूला येणारे वर्ष चांगले जावे. माझ्या शुभेच्छा नेहेमीच तूझ्या बरोबर असतील.”

सचिन आणि रहाणे भारताकडून तसेच मुंबई संघातून एकत्र खेळले आहेत. याबरोबरच रहाणेला अनेक क्रिकेटपटूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

रहाणेने नुकतेच पार पडलेल्या अायपीएल मोसमात राजस्थान रॉसल्सचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाने आयपीएलच्या प्लेआॅफमध्ये स्थान मिळवले होते.

याबरोबरच रहाणे 14 ते 18 जून दरम्यान होणार असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र असे असले तरी त्याची जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही.