बॅटवर स्टिकर, बाॅडीवर टॅटू नसलेला मयांक अगरवाल राहुल- विजयला सरस

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आजपासून सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 4 बाद 303 धावा केल्या आहेत.

या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने अर्धशतकी खेळी केली. त्याने या सामन्यात 112 चेंडूत 77 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. मयंकचा हा कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना आहे.

त्याने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यातही पहिल्या डावात 76 धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेत तीन डावात आत्तापर्यंत 65 च्या सरासरीने 195 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याने एकट्याने तीन डावात केलेल्या या धावा अन्य भारतीय सलामीवीरांनी मागील 11 डावात केलेल्या धावांपेक्षा 68 धावांनी जास्त आहेत. मागील 11 डावात मयंक व्यतिरिक्त अन्य भारतीय सलामीवीरांनी मिळून 127 धावा केल्या आहेत. यात एकही अर्धशतकाचा समावेश नाही.

तसेच मयंक हा कसोटी कारकिर्दीत पहिल्या दोन सामन्यातील प्रत्येकी पहिल्या डावात अर्धशतक करणारा भारताचा चौथा फलंदाज आहे. याआधी दत्तू फडकर, राहुल द्रविड, अरुण लाल यांनी त्यांच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातील प्रत्येकी पहिल्या डावात अर्धशतक केले होते.

सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटीत त्याने चेतेश्वर पुजारा बरोबर दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची शतकी भागीदारी केली आहे. पुजारानेही या सामन्यात त्याचे 18 वे कसोटी शतक पूर्ण केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

षटकारांची बरसात करत त्या खेळाडूने मोडला हिटमॅनचा हिट विक्रम

सिडनी कसोटीत शतकवीर पुजारा चमकला, केले हे ५ खास विक्रम

धावांचा रतिब घालणाऱ्या मयांक अगरवालच्या नावावर दुसऱ्याच कसोटीत नकोसा विक्रम