मयंक अगरवाल असा पराक्रम करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज

मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

मयंकने त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात 95 चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना खास विक्रम केला आहे.

तो परदेशात कसोटी पदार्पणाच्या सामन्यात एका डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज आहे.

याआधी असा पराक्रम सुधीर नाईक, सुनील गावसकर, विनू मंकड आणि लालचंद राजपूत यांनी केला आहे. यात गावसकरांनी 1971 मध्ये विंडीज विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये केलेल्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली होती.

मयंकने या सामन्यात त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत पूर्ण केले. मात्र दुसऱ्या सत्रात त्याला पॅट कमिन्सने 76 धावांवर असताना बाद केले.

त्याने या डावात सुरुवातीला हनुमा विहारी बरोबर 40 धावांची सलामी भागीदारी केली होती. पण विहारी 8 धावांवर असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मयंकने चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची अर्धशतकी भागीदारी केली.

या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात 54.5 षटकात 2 बाद 123 धावा केल्या आहेत. पुजारा 33 धावांवर नाबाद आहे.

परदेशात कसोटी पदार्पणाच्या सामन्यात एका डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर फलंदाज – 

77 धावा – सुधीर नाईक (बर्मिंगहॅम, इंग्लंड, 1974)

76 धावा –  मयंक अगरवाल (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया,2018)

67* धावा – सुनील गावसकर (पोर्ट ऑफ स्पेन, विंडीज,1971)

65 धावा – सुनील गावसकर (पोर्ट ऑफ स्पेन, विंडीज,1971)

63 धावा – विनू मंकड (लॉर्ड्स, इंग्लंड,1946)

61 धावा – लालचंद राजपूत (कोलंबो, श्रीलंका,1985)

महत्त्वाच्या बातम्या:

पदार्पणाच्या सामन्यात शानदार अर्धशतक करणाऱ्या मयंक अगरवालने केला हा खास विक्रम

पहिला सामना खेळणाऱ्या मयांक अगरवालने मैदानात पाय ठेवताच झाला विक्रम

८२ वर्षांनी टीम इंडियाला अनुभवयाला मिळाला हा सुवर्णक्षण