आयपीएलमध्ये मामा करणार या भाच्याला मार्गदर्शन

आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी झालेल्या लिलावात अनेक नवीन खेळाडूंची नावे सर्वांसमोर आली आहेत. मग यात काश्मीर मधून आलेला मंजूर दर असो किंवा आदित्य बिर्ला ग्रुपच्या अध्यक्षांचा मुलगा अर्यमान बिर्ला असो.

अशी अनेक नावे समोर येत असताना मयंक डागर या खेळाडूचे नाव पुढे आले ते भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागमुळे. सेहवाग हा मयंकचा मामा आहे.

मयंकला आयपीएल लिलावात २० लाख या त्याच्या मूळ किमतीतच किंग्स इलेव्हन पंजाब संघाने खरेदी केले. विशेष म्हणजे या संघाचा प्रशिक्षकही सेहवाग आहे आणि सेहवाग लिलावाच्या वेळी उपस्थित होता.

मयंकला लिलावाच्या पहिल्या फेरीत कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. पण शेवटच्या फेरीत त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने संघात समाविष्ट करून घेतले.

सेहवागचा भाच्चा असला तरी मयंक गोलंदाज आहे. त्याने १९ वर्षांखालील भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो हिमाचल प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. त्याने आत्तापर्यंत ११ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३४.५३ च्या सरासरीने ३० बळी घेतले आहेत.

याबरोबरच मयंक त्याच्या स्टाईल, गुड लुक्स आणि फिटनेस यासाठी सुद्धा चांगलाच चर्चेत असून याबाबत त्याची तुलना भारताचा कर्णधार विराट कोहलीशी होत आहे.