राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नेमबाजीमध्ये भारतीय महिलांचे वर्चस्व

ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी चौथ्या दिवसाप्रमाणेच आजही भारताला दोन पदके मिळवून दिली आहेत. १०मी एअर रायफल क्रिडा प्रकारात मेहूली घोषने रौप्य तर आपूर्वी चंडेलाने कांस्य पदक जिंकले आहे.

मेहूली अंतिम फेरीपर्यंत सुवर्णपदकाचा शर्यतीत होती. कारण तिचे आणि सुवर्णपदक विजेत्या मार्टिना लिंडसेचे अंतिम फेरीपर्यंत २४७.२ असे सारखे पॉईंट्स होते. पण अंतिम फेरीत मेहूली ९.९ पॉइंट्सचच लक्ष्य भेदले तर मार्टिनाने १०.३ पॉईंट्सचे लक्ष्य भेदले. यामुळे मेहुलीला सुवर्णपदक गमवावे लागले.

त्याचबरोबर २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती आपूर्वीने आज २२५.३ पॉईंट्स मिळवत कांस्य पदकाची कमाई केली.

यामुळे आता भारताच्या खात्यात १७ पदके झाली आहेत. यात ८ सुवर्णपदके, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. आजच्या दिवसात भारताच्या खात्यात आत्तापर्यंत ५ पदके जमा झाली आहेत.