आठवण – भारताच्या विश्वविजयाची 

-आदित्य गुंड 

२०११ चा विश्वकरंडक झाला  तेव्हा मी अमेरिकेत होतो. भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी आम्हाला सकाळी लेक्चर होते. त्या दिवशी वर्गातल्या ५-६ भारतीय मुलांपैकी फक्त एक जण वर्गात उपस्थित होता. तोही वर्गातून मेसेज करून आम्हाला स्कोअर काय झाला असे सतत विचारत होता. भारताने हा सामना जिंकला ही बरीच मोठी बातमी होती. आमच्या चायनीज प्रोफेसरनेदेखील ही बातमी वाचली होती. दुसऱ्या दिवशी वर्गात गेल्यानंतर त्याने आम्हाला तास बुडवल्याबद्दल काहीही न बोलता उलट भारताने सामना जिंकल्याबद्दल आमचे अभिनंदन केले होते.  

आता प्रतिक्षा होती २ एप्रिलच्या शनिवारची. आशिया खंडात झालेला हा विश्वकरंडक भारत जिंकेल असे भाकीत अनेकांनी वर्तवले होते. नॉकआऊटमध्ये आपण ऑस्ट्रेलियाला हरवले तेव्हाच आपण हा विश्वकरंडक जिंकणार असे मला वाटले होते. अमेरिकेत विश्वकरंडकाचे सामने टीव्हीवर दिसायचे नाहीत. त्याला पर्याय म्हणून आम्ही मित्रांनी मिळून विलो क्रिकेट या ऑनलाईन स्ट्रिमिंग करणाऱ्या वेबसाईटचे पॅकेज विकत घेतले होते. वर्ल्ड कप पॅकेजचे हे ३० डॉलर्स आम्ही सगळ्यांनी मिळून भरले होते तेव्हा. 

भारत अंतिम फेरीत गेल्यावर लगेचच आमच्या एका रूममेटने लायब्ररीमध्ये प्रोजेक्टर बुक करून ठेवला. अंतिम फेरीचा थरार लॅपटॉपवर बघण्यापेक्षा प्रोजेक्टरवर मोठ्या पडद्यावर बघुयात अशी त्याची आयडिया होती. भारतात दिवसरात्र खेळला गेलेला हा सामना पाहण्यासाठी आम्ही सगळे रूममेट्स अमेरिकेत पहाटेच उठलो होतो. सामना सगळ्यांनी मिळून बघायचा असे ठरले असल्याने आमचे अजून २-३ मित्र देखील रात्रीच आमच्या घरी झोपायला आले होते. सामना सुरु होताच प्रत्येकाने आपापली जागा पकडली. कोणी उशीला टेकून, कोणी झोपून, कोणी आपल्या समोर लॅपटॉप उघडून,कोणी इतर मित्रांशी सुरु असलेल्या चॅट विंडोज ओपन ठेवून. श्रीलंकेची बॅटिंग असल्याने सगळे जण थोडेसे आरामात होते. मॅच बघता बघता एखाद्या असाइनमेंटचे कामही उरकले जात होते. 

झहीरने श्रीलंकेचा पहिला गडी बाद करताच आम्ही सगळे जोरात ओरडलो. पण अजूनही पहाट आहे हे लक्षात येऊन लगेचच शांतही झालो. नंतर आलेल्या दिलशानने संगकाराच्या जोडीने लंकेच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. 

“यार इन दोनोमेसे किसी एक को आउट करना चाहिये. नही तो मुश्किल होगा.”

अशी वाक्ये ऐकायला येऊ लागली असतानाच हरभजनने दिलशानला बाद केले. 

“क्या बढिया बॉल थी यार. मानना पडेगा भज्जीको.” आमचा एक मित्र हरभजनचे कौतुक करत म्हणाला. 

दिलशननंतर आलेल्या जयवर्धनेने संगकाराला जोडीला घेत धावफलक हलता ठेवला. तो त्या दिवशी आपण टिकून खेळायचे असे ठरवूनच आला होता जणू. ह्या दोघांची जोडी जमली असे वाटत होते. नेमकं त्याच वेळेस रवी शास्त्री समालोचन करू लागला. 

रवी शास्त्री समालोचन करायला आला की भारताला विकेट मिळते अशी मी आणि माझा एक मित्र मनू, आम्हा दोघांची त्यावेळेसची एक भाबडी अंधश्रद्धा होती. खरोखर तसेच झाले आणि धोका ठरू शकेल अशा संगकाराला युवराजने बाद केले. 

“यार रवी चाचा जब तक है माईक पे तब तक इंडिया को विकेट मिलती रहेगी.” मनू लगेच म्हणाला. 

जयवर्धनेच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच होते. येईल त्या फलंदाजाला हाताशी धरून तो एकटा किल्ला लढवत होता. आज आपली विकेट द्यायची नाही अशी खूणगाठ जणू त्याने मनाशी बांधली होती. त्याने शतक पूर्ण केले तेव्हा केलेला जल्लोष बघून आमच्यातल्या एक दोन जणांनी त्याला आईबहिणीवरून शिव्या दिल्या. हा आज भारताला नडणार असे आम्हाला सगळ्यांना वाटू लागले. शतक पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये असलेल्या त्याच्या बायकोने खुणेनेच त्याला “स्टे देअर.” असे सांगितले तेव्हा तिलाही आम्ही शिव्या दिल्या होत्या. अनेक भारतीयांनी देखील दिल्या असतील. शेवटच्या षटकात १८ धावा काढत लंकेने भारतीय प्रेक्षकांचे ब्लड प्रेशर थोडे का होईना वाढवले. कधी नव्हे ते २७५ चं टारगेट अवघड वाटू लागलं. 

दोन डावांतल्या मधल्या वेळात मी आम्हाला सगळ्यांना मस्तपैकी आलं, वेलदोडे  टाकून चहा केला. गरम चहाचा आस्वाद घेत पुन्हा आम्ही सगळे आपापल्या जागी बसलो. भारताची बॅटिंग असल्याने आता कोणीही कोणतेही काम करत नव्हते. त्या विश्वकरंडकात जवळजवळ प्रत्येक सामन्यात पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सेहवाग भारताच्या डावाची सुरुवात करत होता. या सामन्यात मात्र पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नव्हती. याबाबतची चर्चा आमच्यात चालू असतानाच मलिंगाने सेहवागला पायचित केले. त्याने अजिबात वेळ ना दवडता, सचिनबरोबर चर्चा न करता तो निर्णय टीव्ही अंपायरकडे रिव्यू केला. 

“क्या यार ये सेहवाग. एक तो आउट हुआ और उपरसे रिव्यू भी किया. बात तो कर लेता गॉडके साथ.” (सचिनला आम्ही सगळे ‘गॉड’ असंच बोलावतो.)  आमच्यातला एक जण सेहवागला शिव्या देत म्हणाला. 

” कोई नही. गॉड है अभी भी. चिंता नही.” म्हणत अजून एका मित्राने आम्हाला धीर दिला. कित्येक भारतीयांचीसुद्धा हीच मनस्थिती होती. ‘ सचिन आहे ना? मग ठीके.’ म्हणत स्वतःला आणि इतरांना लोक धीर देत असत. 

त्यात त्याने कुलशेखराला त्याचा टिपिकल सचिन स्ट्रेट ड्राइव्हचा चौकार मारला. तो शॉट बघून आम्ही सगळेच वेडे झालो. 

“ये है यार शॉट.”

“इसे केहते है भाई स्ट्रेट ड्राइव्ह.”

“कमाल का बंदा है यार सचिन.”

अशी वाक्ये लागोपाठ कानावर आली. त्या एका चौकाराने सचिनने सबंध भारताच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या होत्या. 

पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मलिंगाच्या उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूला सचिनने बॅट लावली आणि बाद झाला. वानखेडेवर प्रचंड शांतात पसरली, मलिंगचा आनंद बघण्याजोगा होता. आम्ही सगळेच शांत झालो. त्या वेळेस मलिंगाला सगळ्या भारताने शिव्या घातल्या असतील. आम्हीही मागे नव्हतोच. मी माझी बहिण दिप्तीला फोन केला. तिने टीव्ही बंद केला होता. 

“मी नाही बघू शकत हे.” ती पलीकडून म्हणाली. 

“आता अवघड आहे.” मी तिला म्हटल्याचे मला आठवतंय. त्यानंतर लगेचच मी दादांना फोन केला. ते सुद्धा झोपायच्या तयारीला लागले होते. एकटा सचिन बाद झाला तर निम्म्या भारताने जिंकण्याची आशा सोडून दिली होती. लोकांनी टीव्ही बंद केले होते. किती हा एका माणसावरचा विश्वास. 

“चल यार मै लॅब जाता हूँ.” आमचा मित्र आर्का चट्टोपाध्याय निराश होऊन म्हणाला. 

“अबे रुक. जितेंगे.” त्याला धीर देत मनू म्हणाला. 

पण त्याने मनूचे ऐकले नाही आणि लॅबमध्ये जाऊन काम करू लागला. उरलेल्या आम्हाला अजूनही आशा होती. तशा उदास मनस्थितीत मनू बाहेर जाऊन सिगारेट ओढून आला. 

सचिनच्या जागी आलेल्या तेव्हाच्या नवख्या विराटला हाताशी धरून गंभीर भारतीय डावाला आकार देऊ लागला.  सावकाश का होईना धावफलक हलता ठेवत त्याने आपले अर्धशतक साजरे केले. गंभीर आणि विराट टिकलेत असे वाटत असतानाच दिलशानने विराटला अप्रतिम झेल घेत बाद केले. त्याने विराटला दिलेला सेंडऑफ बघून मी स्वतः दिलशानला मजबूत शिव्या दिल्या होत्या. 

युवराज बॅटिंगला येईल असे वाटत असतानाच अचानक धोनी बाहेर आला. स्वतःला प्रमोट करत धोनीने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे असा संदेश दिला. सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत असताना या दोघांनी खेळायला सुरुवात केली. गरज पडेल तेव्हा एक दोन धावा काढत हे दोघे खेळत होते. सामना जिंकायला लागणाऱ्या धावा आणि उरलेले चेंडू याच समीकरण हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेत होते. सामना जिंकायला ५० वगैरे धावा उरलेल्या असताना गंभीर ९७ धावांवर बाद झाला. हातातून निसटलेला सामना आटोक्यात आणायचे काम त्याने केले होते. त्याचे शतक हुकले याची हुरहूर सगळ्यांच्याच मनाला लागली. 

“सेंच्युरी होनी चाहिये थी यार इसकी.”

“कोई नही. बढिया खेला बंदा” आमच्यातले एक दोन जण पुटपुटले. 

गंभीर बाद झाला तरी भारतीय प्रेक्षकांनी आशा सोडली नव्हती. अजूनही भारत जिंकणार असेच सगळ्यांना वाटत होते. आता तर २०११ वर्ल्डकपचा हिरो युवराज सिंग खेळायला आला होता. धोनी नेहमीप्रमाणे शांत चित्ताने खेळत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही ताण दिसत नव्हता. सगळे काही हवे तसे घडत असतानाच सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात रवी शास्त्री समालोचन करू लागला आणि लगेच मनू म्हणाला, 

“अब नही हारेंगे भाई. चाचा हमें जिताके रहेंगे.” 

त्याच्या या वाक्याला आम्ही हसून दाद दिली. धोनी आणि युवराज धावा आणि चेंडूंचे समीकरण आटोक्यात ठेवत होते. जरा तणाव वाटला की एखादा चौकार मारून तो तणाव झुगारून टाकत होते. जिंकायला चार धावा शिल्लक असताना धोनीने कुलशेखराचा चेंडू सीमारेषेपार भिरकावला. रवी शास्त्री उत्साहाच्या भरात, 

“धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल.” हे वाक्य जवळजवळ ओरडला. आम्ही सगळ्यांनी एकच जल्लोष केला. आम्ही वेड्यासारखे नाचत होतो. अमेरिकेला जाताना पुण्याच्या मुरुडकर झेंडेवाल्याकडून मी तिरंगा नेला होता आणि माझ्या घराच्या लिविंग रूममध्ये लावला होता. मी पळत बाहेर जाऊन  तिरंगा काढून आणला. तिरंगा फडकावत आम्ही बेभान होऊन नाचत होतो. एकमेकांना मिठ्या मारत होतो. हरभजन आणि युवराज मैदानावर रडत होते. इतका वेळ त्यांना बघूनही शांत असेलेले आम्ही सचिनने युवराजला मारलेली मिठी पाहून रडू लागलो. तो आनंद वेगळा होता. तो जल्लोष वेगळा होता. प्रोजेक्टर समोर उभे राहून आम्ही फोटो काढत होतो. फेसबुकवर दिसेल ते स्टेटस लाईक करत होतो, आत्तापर्यंत कधीही संपर्कात नसलेल्या पण फेसबुकवर मित्र असलेल्या मित्रांशी बोलत होतो, दिसेल ते ट्विट रिट्विट करत होतो, भारतातल्या मित्रांना फोन करून अभिनंदन करत होतो. हे सगळे अवर्णनीय होते.  भारताने वर्ल्डकप जिंकल्याची झिंग पुढचे दोन तीन दिवस तशीच होती. १९८३ चा वर्ल्डकप बघायला ना मिळालेल्या आमच्या पिढीला धोनी आणि त्याच्या संघाने आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही असा एक नजराणा दिला होता.