“छत्रपती शिवाजी महाराज चषक” कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर व ठाणेचे पुरुष व महिला दोन्ही संघ उपांत्य फेरीत

सांगली: छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बादफेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली. इस्लामपूर-सांगली येथे सुरू असलेल्या २० व्या वरिष्ठ गट आंतर-राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिलांचे व पुरुषाचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले.

महिला विभागात पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात कोल्हापूरने पुणेला चांगली झुंज दिली. मध्यंतरापर्यत १५-१० अशी आघाडी पुण्याकडे होती. आम्रपली गलांडे व आदिती जाधवने चांगला खेळ केला. पुणे हा सामना ३५-२५ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

ठाणे विरुद्ध पालघर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाणे ने ४१-१५ असा विजय मिळवला. मुंबई शहरने नाशिक वर ४९-१९ असा एकतर्फी विजय मिळवला. महिलांच्या मुंबई उपनगर विरुद्ध रत्नागिरी चौथ्या उपांत्यपूर्व सामना अत्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरा पर्यंत १८-१२ अशी आघाडी रत्नागिरीकडे होती. श्रद्धा पवारने केलेल्या आक्रमक चढायांमुळे रत्नागिरीने आघाडी घेतली होती. शेवटचा मिनिट शिल्लक असताना उपनगर रत्नागिरी वर लोन टाकत सामन्यातील चुरस वाढवली. रत्नागिरी कडे १ गुणाची आघाडी असताना सामन्याची शेवटची रेड मध्ये उपनगरच्या कोमल देवकर ने बोनस केला पण तिची पकड झाली. रत्नागिरी ३४-३३ असा विजय मिळवला.

पुरुष विभागात मुंबई शहर विरुद्ध नंदुरबार यांच्यात चुरशीची लढत झाली. मध्यंतरापर्यंत १८-१८ असा सामना बरोबरीत होता. नंदुरबार कडून सूरज देसाईने चांगला खेळ केला. मुंबई शहरच्या अजिंक्य कापरेने केलेल्या सुपररेड ने सामन्याला कलाटणी दिली. मुंबई शहराने ४३-३२ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत मिळवला. यजमान सांगली संघाने रत्नागिरीचा ३६-२० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. सांगलीच्या नितीन मदने एकाच चढाईत ७ खेळाडूंना बाद करत लोन मिळवून अशी ९ गुणांची कमाई केली.

पुरुष विभागात रायगड विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात सुरुवातीला चुरशीची लढत मध्यंतरानंतर उपनगरने एकतर्फी विजय मिळवला. ४६-३० असा विजय मिळवत मुंबई उपनगरने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपनगरच्या विजयात नितीन देशमुख व अनुज यादव चमकले. ठाणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झालेला सामना ठाणे ने ४५-३८ असा जिंकला.

आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य फेरीचे सामने व अंतिम सामने होतील. महिला विभागात पुणे विरुद्ध मुंबई शहर व रत्नागिरी विरुद्ध ठाणे यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होतील. पुरुष विभागात मुंबई शहर विरुद्ध सांगली व मुंबई उपनगर विरुद्ध ठाणे असे सामने होतील.

महिला विभाग उपांत्य फेरी

१) पुणे विरुद्ध मुंबई शहर

२) ठाणे विरुद्ध रत्नागिरी

पुरुष विभाग उपांत्य फेरी

१) मुंबई उपनगर विरुद्ध ठाणे

२) मुंबई शहर विरुद्ध सांगली