कर्णधार विराट असलेला आयसीसी २०१७चा वनडे संघ जाहीर; भारताच्या ३ खेळाडूंचा सहभाग

आज आयसीसीने २०१७ चा वनडे संघ जाहीर केला आहे. या संघात भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन भारतीय खेळाडूंचा सहभाग आहे.

या संघाचा कर्णधार म्हणून विराटाचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत कसोटीत अव्वल तर वनडेत दुसरे स्थान मिळवले आहे.

विराटची आयसीसीच्या वनडे संघात चौथ्यांदा निवड झाली आहे. या आधी तो २०१२, २०१४ आणि २०१६ साली आयसीसी वनडे संघात होता.

याबरोबरच आयसीसी वनडे संघात निवड झालेले रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासाठीही २०१७ हे वर्ष उत्तम गेले होते. या पुरस्कारांसाठी आयसीसीने २१ सप्टेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीतील कामगिरी लक्षात घेतली होती.

या कालावधीत विराटने वनडेत ७ शतकांसह ८२.६३ च्या सरासरीने १८१८ धावा केल्या होत्या. या कालावधीत विराट कोहली वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या पाठोपाठ वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने ६१.५६ च्या सरासरीने ६ शतकांसह १४१६ धावा केल्या आहेत.

तसेच या आयसीसी वनडे संघात स्थान मिळालेला तिसरा भारतीय जसप्रीत बुमराहने या कालावधीत वनडेत ४५ बळी घेतले आहेत. या संघात विराट, रोहित, बुमराह बरोबरच दक्षिण आफ्रिकेचे एबी डिव्हिलियर्स ,क्विंटॉन डीकॉक, पाकिस्तानचा बाबर आझम,हसन अली, इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स यांचा देखील समावेश आहे.

असा आहे २०१७ चा आयसीसी वनडे संघ:

डेव्हिड वॉर्नर(ऑस्ट्रेलिया)
रोहित शर्मा (भारत)
विराट कोहली (कर्णधार) (भारत)
बाबर आझम (पाकिस्तान)
एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
क्विंटॉन डीकॉक (दक्षिण आफ्रिका)
बेन स्टोक्स (इंग्लंड)
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
हसन अली (पाकिस्तान)
रशीद खान (अफगाणिस्तान)
जसप्रीत बुमराह (भारत)