La Liga: सॅंटियागो बर्नब्यूवर पुन्हा एकदा मेस्सीच्या बार्सिलोनाचा बोलबाला

लिओनेल मेस्सीच्या एफसी बार्सिलोनाने सॅंटियागो बर्नब्यूवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत रियल मॅड्रिडचा ०-३ ने पराभव केला. बार्सिलोनातर्फे सुवारेज, मेस्सी आणि बदली खेळाडू म्हणून आलेल्या ॲलेक्सिस विदालने गोल नोंदवले. बार्सिलोनाने सर्व गोल्स दुसऱ्या हाफ मध्ये नोंदवले.

या विजयासह बार्सिलोनाने गुणतालीकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ॲटलेटिको डी मॅड्रिडवर ९ गुणांची बढत घेतली आहे तर पारंपारिक प्रतिस्पर्धी रियल मॅड्रिडवर १४ गुणांची बढत घेत त्यांच्या लीग जिंकायच्या आशा जवळजवळ संपुष्टात आणल्या.

त्यापूर्वी, पहिल्या हाफच्या सुरुवातीस रोनाल्डोने दुसऱ्या मिनिटालाच बाॅल गोलपोस्ट मध्ये टाकला पण तो ऑफसाईड असल्यामुळे गोल दिला गेला नाही. पुढे संपूर्ण हाफ मॅड्रिडच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व गाजवले. काही संधी पण निर्माण झाल्या परंतु त्याचे गोल मध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले.

बार्सिलोनातर्फे फक्त पाॅलिन्होला २ संधी मिळाल्या पण त्याचे गोल मध्ये रुपांतर झाले नाही. उमतीतीच्या अनुपस्थितीत पिके आणि थाॅमस वरमाईलनने अप्रतिम प्रदर्शन दाखवले आणि त्याचाच फायदा बार्सिलोनाला झाला. पहिला हाफ त्यांना मॅड्रिडला ०-० ने बरोबरीत रोखता आले.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासूनच बार्सिलोनाने खेळामध्ये बदल आणला आणि खेळ आपल्या नियंत्रणात घेतला. बुस्केटने बार्सिलोनाच्या पेनल्टीबाॅक्स जवळून बाॅल काढला पुढे तो सर्जी रोबर्टोने सुवारेजला दिला सुवारेजने गोल करत १ गोलची आघाडी घेतली. हा सुवारेजचा ४०० वा गोल होता.

 

६४ व्या मिनिटाला गोलकीपरला चकवत केलेला गोलचा प्रयत्न डॅनी कारवाहालने हाताने अडवत रेडकार्ड घेऊन मॅड्रिडला १० खेळाडूं सोबत मैदानावर सोडले. मिळालेल्या पेनल्टी चा फायदा घेत मेस्सीने बढत २ गोल्सची केली. ०-२ ने पिछाडीवर गेल्याने झिदानेने बेले आणि ॲसेन्सियोला मैदानात उतरवले.

पण १० विरुद्ध ११ खेळाडूंचा सामना असल्याने मॅड्रिडला कोणताही चमत्कार करता आला नाही. अतिरिक्त वेळेत आलेल्या विदालने शेवटच्या मिनिटामध्ये गोल करत बढत ०-३ केली.

सॅंटियागो बर्नब्यूवरील मागील तीन ला लीगाच्या क्लासिको सामन्यात रियल मॅड्रिडला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

या विजयासह मेस्सीने हे विक्रम केले आपल्या नावे:-

# युरोपच्या टाॅप ५ लीगमध्ये एका क्लबकडून सर्वाधिक ५२६ गोल्स

# क्लासिको मध्ये सर्वाधिक २५ गोल्स.

# सॅंटियागो बर्नब्यूवर क्लासिकोमध्ये सर्वाधिक १५ गोल्स.

# ला लीगामध्ये रियल मॅड्रिड विरुद्ध सर्वाधिक १७ गोल्स.

# २०१७ मध्ये क्लब आणि देशाकडून सर्वाधिक ५४ गोल्स