बार्सिलोनाची ला लीगावर मजबूत पकड

बार्सिलोनाचा विजयी रथ रोखण्यात ऐथलेटिक क्लबला अपयश आले. २-० असा विजय मिळवत बार्सिलोनानेला लिगाच्या गुणतालिकेत आपले प्रथम स्थान अधिक मजबुत केले आहे.

१० सामन्यात ९ विजय आणि १ ड्रॉच्या मदतीने २८ गुणांनसह बार्सिलोना १ तर २४ गुणांनसह वॅलेन्सिया २ आणि २० गुणांनसह रियल मद्रिद तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रियल मद्रिदने १ सामना कमी खेळला आहे जो आज त्यांचा गिरोना बरोबर होणार आहे.

पहिल्या हाफच्या सुरूवातिपासून दोन्ही संघांनी आक्रमणावर जास्त भर दिला. १७ व्या मिनिटाला उजव्या बाजूने आलेल्या क्रॉसला ॲडरुझने हेडरने गोल करायचा प्रयत्न केला पण बार्सिलोनाचा गोलकीपर टेर स्टेगनने तो वाचवला.

२ मिनिटानंतर १९ व्या मिनिटाला ॲडरुझने परत एकदा आलेल्या पासवर गोलचा प्रयत्न केला तेव्हा फक्त टेर स्टेगन आणि तो असताना सुद्धा स्टेगनने अप्रतिमरित्या गोल वाचवला. २१ व्या मिनिटाला मेस्सीने एथलेटिक क्लबच्या गोलकिपर केपाला चकवत बाॅल पुढे नेला पण तो गोलपोस्टच्या बारला लागला.

३६ व्या मिनिटाला मेस्सीने डाव्या बाजूला असलेल्या अल्बाकडे पास दिला आणि त्याने तो परत मेस्सीकडे दिला आणि कोणत्या डिफ़ेंडरला काही समजायच्या आधी मेस्सीने गोल करत १-० अशी बढत मिळवून दिली.

४० व्या मिनिटाला मेस्सीने परत संधी तयार केली आणि पौलिन्होकडे पास दिला पण बॉल परत एकदा गोलपोस्टला लागून आला.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी गोल करायच्या काही संधी गमावल्या. सामना शेवटच्या १० मिनिटामध्ये पोहचल्यावर बार्सिलोनाने वेळ वाया घालवायचा प्रयत्न चालू केला आणि त्यामुळेच उमतितिला रेफ़रीने येलो कार्ड दिले.

८६ व्या मिनिटाला एथलेटिक क्लबला मिळालेल्या डाव्या बाजूच्या कॉर्नरने मारलेला बॉल ॲडरूझने डाव्या कोपर्यात मारला पण टेर स्टेगनने तो वाचवत बार्सिलोनासाठी २ गुण वाचवले. मेस्सीने ९० व्या मिनिटाला मिळालेली फ्री कीक काही इंचाने मिस केली.

३ मिनिटाचा इंजुरी टाईम रेफ्रीने दिला आणि ९२ व्या मिनिटाला बार्सिलोनाने काउंटर अटॅक केला. मेस्सीने बाॅल पुढे घेऊन जात डाव्या बाजूला असलेल्या सुवारेजला पास दिला.

त्याने तो गोलसाठी मारला पण गोलकीपरने वाचवला आणि तिथेच असलेल्या पौलिन्होने सहजरित्या त्याला गोलपोस्ट मध्ये टाकत बार्सिलोनाला २-० अशी विजयी बढत मिळवून दिली.

आपणास माहीत नसेल तर:
१.२०१७ मध्ये ला लीगात मेस्सीने सर्वाधिक ३७ गोल्स केले आहेत तर सुवारेज २० गोल्स सहित २ नंबरला आहे. क्रिस्तिआनो रोनाल्डो १६ गोल्स करत चौथ्या स्थानावर आहे.

२.बार्सिलोनाने ला लीगाच्या इतिहासातली १० राउंड नंतरची कोणत्याही टीमची सर्वोत्तम सुरुवात नोंदवली. त्यांनी ९ सामने जिंकले तर १ ड्राॅ आणि २५ चा गोलफरक आहे.

३. बार्सिलोना संघाने १३ वेळा आणि त्यात मेस्सीने तब्बल १० वेळा गोलपोस्टच्या बारला बाॅल मारला आहे.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)