रियल मॅड्रिडचा सहज विजय तर बार्सेलोनासाठी मेस्सी आला पुन्हा धावून

क्लब फुटबाॅलला काल २ आठवड्याच्या मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरुवात झाली. ला लीगाच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे बार्सेलोना बरोबरच रियल मॅड्रिडचा सुद्धा सामना कालच झाला. रियल मॅड्रिडचा सामना लास पाल्मस विरुद्ध तर बार्सेलोनाचा सेविल्ला विरुद्ध होता.

रियल मॅड्रिडने रोनाल्डो, क्रुस आणि रामोसला संघाच्या बाहेर ठेवत आराम दिला. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत बेन्झेमा आणि बेलेने सामन्यास सुरुवात केली. या मौसमात रोनाल्डोच्या अनुपस्थितीत रियल मॅड्रिडला ६ सामन्यात केवळ ३ विजय मिळवता आले होते. या सामन्यात सुद्धा मॅड्रिड सामन्यावर पकड मिळवण्यात अपयशी होत असतानाच २६ व्या मिनिटला माॅड्रिकने बेलेकडे पास दिला आणि त्याने गोल करत ०-१ ची आघाडी मिळवून दिली.

आपला ४०० वा सामना खेळणार्या बेन्झेमाने ३९ व्या मिनिटला मॅड्रिडला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत ०-२ ची आघाडी मिळवली. पहिल्या हाफच्या सुरुवातीला सामन्यावर मिळवलेली पकड २ गोल झाल्याने लास पाल्मसने गमावली. दूसर्या हाफच्या ५१ व्या मिनिटला पुन्हा एकदा मॅड्रिडवा पेनल्टी मिळाली आणि या वेळेस बेलेने त्याचा फायदा घेत सामन्यातला तिसरा गोल केला.

या पेनल्टी बरोबरच मॅड्रिडने मागील दशकात सर्वाधिक ७७ पेनल्टी गोल्स केले आहेत या काळात त्यांना ९१ वेळा पेनल्टी मिळाली आहे. हा विक्रम आधी एसी मिलन (७५) च्या नावावर होता.

तर रात्री झालेल्या सेविल्ला विरुद्ध बार्सेलोना सामन्यात दुखापतीमुळे बुस्केटला विश्रांती तर दुखापतीतुन आत्ताच सावरलेल्या मेस्सीला पहिल्या ११ मध्ये स्थान देण्यात आले नाही. सुवारेझ, डेम्बेले आणि काॅटिन्हो यांना घेऊन बार्सेलोनाने सामन्याला सुरुवात केली. मेस्सीच्या अनुपस्थितीत बार्सेलोनाचा अटॅक विखुरलेला वाटत होता.

त्याचा फायदा घेत ३६ व्या मिनिटला सेविल्लाच्या कोरेयाने बार्सेलोनाच्या उमतीती आणि पीकेला चकवत फ्राॅंको वाझकॅझकडे पास दिला त्याने अलगद बाॅल ढकलत गोल केला आणि सामन्यात १-० ची घेतलेली बढत पहिल्या हाफ पर्यंत कायम ठेवली. दूसर्या हाफच्या ६ मिनिटात ५१ मिनिटला वाझकॅझने पुन्हा एकदा मारलेला बाॅल टेर स्टेगनने परतवला आणि रिबाऊंडवर मुरियलने गोल करत बार्सेलोनाला ०-२ चा धक्का दिला.

सामन्याची परिस्थिती पाहता बार्सेलोनाने डेम्बेलेचा जागी बदली खेळाडू म्हणुन मेस्सीला सामन्यात उतरवले. त्याच्या येण्याने बार्सेलोनाने काही आक्रमण केले पण मेस्सीला संधी मिळत नव्हती. शेवटचे १० मिनिट असताना डेनिस सुवारेझ आणि पॅको अलकॅसरला मैदानावर बदली खेळाडू म्हणून उतरवले.

सामना शेवटच्या २ मिनिटात गेला असताना मिळालेल्या काॅर्नरवर सुवारेझने गोल करत सामन्यात पुनरागमनाच्या आशा जिवंत ठेवल्या. सुवारेझच्या गोलनंतर अवघ्या ५३ सेकंदाने काॅटिन्होने दिलेल्या बॅक पास डेनिस मारणार असे वाटत असताना मेस्सीने बाॅल मारला आणि डाव्या कोपर्यात खाली गोलकीपरला चकवत बाॅल गोलपोस्ट मध्ये गेला आणि सामना २-२ ने अनिर्णित सुटला.

सामन्यात दोनदा बार्सेलोनाने बाॅल पोस्टला मारला. या मौसमात युरोपच्या ५ सर्वोत्तम लीगमध्ये बार्सेलोनाने सर्वाधिक ३१ वेळा बाॅल पोस्टवर मारला आहे.
मेस्सीने सेविल्ला संघाविरुद्ध सर्वाधिक ३० गोल्स केले आहेत.

या बरोबरच बार्सेलोना ३७ सामन्यांपासुन अपराजित आहेत. सर्वाधिक सामन्यात अपराजित असण्याचा विक्रम रियल सोसाइडेडच्या नावावर आहे. १९८० साली ते ३८ सामने अपराजित होते. हा विक्रम आपल्या नावावर करण्यापासून बार्सेलोनाला केवळ १ सामना दूर आहे.