इंटरकॉन्टिनेंटल कप 2018: सुनील छेत्रीच्या टीम इंडियाने केनियाचा पराभव करत जिंकले विजेतेपद

मुंबई। 10 जूनला भारताच्या फुटबॉल संघाने केनियाचा 2-0 अशा फरकाने पराभव करत इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

भारताच्या विजयात कर्णधार सुनील छेत्रीने दोनही गोल करत महत्वाची कामगिरी बजावली. त्याने सामन्याच्या 8 व्या आणि 29व्या मिनीटाला भारताकडून गोल केले. छेत्रीने पहिला गोल अनिरुद्ध थापाच्या तर दुसरा गोल अनस एडथोडिकाच्या मदतीने केला.

या स्पर्धेत 4 सामन्यात मिळून भारताने केलेल्या 11 गोलपैकी 8 गोल एकट्या सुनील छेत्रीने केले आहेत. यामुळे आता त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या 64 गोलची बरोबरी केली आहे.

छेत्रीने केलेल्या या कामगिरीमुळे त्याला इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

या स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघाला 5000 अमेरिकन डॉलर्स तर उपविजेत्या केनियाला 2500 अमेरिकन डॉलर्स बक्षीस म्हणून देण्यात आले.

याआधी भारताने साखळी फेरीत तैवानला 4-0, केनियाला 3-0 असे नमविले होते. मात्र भारताला न्यूझीलंड विरुद्ध 1-2 ने पराभव स्वीकारावा लागला होता.

मुंबईत पार पडलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.