आयपीएल २०१८: पॅट कमिन्सच्या ऐवजी हा खेळाडू खेळणार मुंबई इंडियन्समध्ये

मुंबई। आयपीएल २०१८ ची सुरुवात दमदार झाली असतानाच दुसरीकडे खेळाडूंच्या दुखापतीने अनेक संघ त्रस्त आहेत. मुंबई इंडियन्सचेही दोन खेळाडू दुखापतीमुळेच आयपीएलमधून बाहेर पडले आहेत.

यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचाही समावेश आहे. आता मुंबई इंडियन्सच्या संघात दुखापतग्रस्त कमिन्सचा बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडचा गोलंदाज ऍडम मिल्ने खेळेल.

याआधी मिल्ने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून ५ सामन्यात खेळला आहे. यात त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने आजपर्यंत ७० ट्वेन्टी २० सामने खेळताना ७.७७ च्या सरासरीने ८३ विकेट्स घेतल्या.

पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याने ३ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ऍशेस मालिकेत २३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्यासारखा प्रमुख गोलंदाज संघातून बाहेर पडल्याने हा मुंबई संघासाठी मोठा धक्का आहे.

याचबरोबर याआधी मुंबईचाच जेसन बेहेरेंडॉर्फ आयपीएलमधून बाहेर पडला होता. बेहेरेंडॉर्फच्या ऐवजी मिशेल मॅक्लेनघनची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती.