महिला विश्वचषक: मिताली राज महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

इंग्लंड येथे सुरु असलेल्या महिला विश्वचषकात मिताली राजने कारकिर्दीत महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. मिताली राजच्या नावावर सध्या १८३ एकदिवसीय सामन्यांत ५९९३ धावा आहेत.

महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वात प्रबळ दावेदार संघ असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मितालीने नाबाद ३४ धावांची खेळी करताना हा विक्रम केला आहे.

यापूर्वी महिला एकदिवसीय सामन्यांत कारकिर्दीत सार्वधिक धावा करण्याचा विक्रम हा इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्स नावावर होता. तिने १९१ एकदिवसीय सामन्यांत खेळताना ३८.१६ च्या सरासरीने ५९९२ धावा केल्या होत्या.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये एकदिवसीय कारकिर्दीत सार्वधिक धावा करण्याचा विक्रम हा सचिनच्या नावे आहे. मितालीने हा विक्रम आपल्या नावे केल्यामुळे आता हे दोंन्ही विक्रम भारताच्या नावावर झाले आहेत.