महिला विश्वचषक: महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिताली राजचे अर्धशतकांचे अर्धशतक

भारताची महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आज न्युझीलँड विरुद्ध खेळताना विक्रमी ५०वे अर्धशतक केले. जागतिक महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० अर्धशतके करणारी मिताली राजही पहिली खेळाडू ठरली आहे.

इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्सच्या नावावर १९१सामन्यात ४६ एकदिवसीय अर्धशतके आहेत तर ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी तिने ५५वेळा केल्या आहेत. आजचे अर्धशतक मिळून मितालीनेही  १८४ सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी ५५ वेळा केल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यात ५०अर्धशतके करणारी मिताली राजही केवळ सातवी भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय पुरुष क्रिकेटपटूमध्ये केवळ सहा क्रिकेटपटूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये  ५० किंवा त्यापेक्षा जास्त अर्धशतके करता आली आहेत.

यापूर्वी सचिन तेंडुलकर(९६), राहुल द्रविड (८२), सौरव गांगुली (७१), एमएस धोनी(६४), मोहम्मद अझरुद्दीन (५८) आणि युवराज सिंग(५२) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०पेक्षा जास्त अर्धशतके केली आहेत.