ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने विश्वचषकात हा मोठा पराक्रम करत रचला इतिहास

बर्मिंगहॅम। गुरुवारी(11 जूलै) 2019 क्रिकेट विश्वचषकात एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्यांचे 2019 विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले आहे.

असे असले तरी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने खास विश्वविक्रम केला आहे. त्याने या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोची विकेट घेतली. ही त्याची या विश्वचषकातील 27 वी विकेट होती.

त्यामुळे तो एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने हा विश्वविक्रम करताना ग्लेन मॅकग्राथने 2007 च्या विश्वचषकात घेतलेल्या 26 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 223 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 85 धावांची खेळी केली होती. तर ऍलेक्स कॅरेने 46 धावांची छोटेखानी चांगली खेळी केली. तसेच स्टार्कने स्मिथबरोबर फलंदाजी करताना 29 धावाही केल्या.

इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि आदिल राशिदने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने 124 धावांची सलामी भागीदारी रचली. बेअरस्टो 34 धावा केल्या. तर रॉयने 65 चेंडूत 85 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.

हे दोघे बाद झाल्यानंतर इयान मॉर्गनने नाबाद 45 आणि जो रुटने नाबाद 49 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

27 – मिशेल स्टार्क (2019)

26 – ग्लेन मॅकग्राथ (2007)

23 – चामिंडा वास (2003)

23 – मुथय्या मुरलीधरन (2007)

23 – शॉन टेट (2007)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आता राशिद खान सांभाळणार अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद!

विश्वचषकासाठी संघातील समावेश प्रकरणाबाबत डिविलियर्सने सोडले मौन, केला मोठा खूलासा

विश्वचषक २०१९: १६ वर्षांपूर्वीचा पाँटिंगचा विक्रम मोडत जो रुटने रचला इतिहास