मिताली राजने मोडला पुरुष क्रिकेटपटूंचा हा विक्रम !

भारताच्या महिला क्रिकेट संघाने काल उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून आयसीसी महिला विश्वचषक २०१७ च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पावसामुळे ४२ षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात, भारताने प्रथम फलंदाजी करत हरमनप्रीत कौरच्या धडाकेबाज १७१ धावांच्या खेळीच्या जोरावर २८१ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २४५ धांवत गारद झाला. भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला.

हा सामना जिंकून भारताने अंतिम सामन्यात धडाकेबाज प्रवेश केला. मिताली राजच्या या संघाबद्दल कोणत्याच क्रिकेट पंडिताला आत्मविश्वास नव्हता की हा संघ इतकी चांगली कामगिरी करेल. भारताचा महिला संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही वेळेस कर्णधार मितालीच होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आहे.

या आधी १९८३ मध्ये भारताच्या पुरुष संघाने कर्णधार कपिल देवाच्या नेतृत्वखाली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एन्ट्री केली होती व विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २००३ ला भारताने गांगुलीच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरी गाठली होती. २०११ मध्ये कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. पण आतापर्यंत कोणत्याच कर्णधाराने दोन वेळा भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेले नाही. पण काल हा विक्रम मितालीने मोडित काढत एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

२००५ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ९८ धावांनी दारुण पराभव केला होता आणि आता त्याच ऑस्ट्रेलिया संघाला हरवून भारताने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतातील क्रिकेट प्रेमींना आशा लागली आहे की ज्या पद्धतीने भारताने २०१७ विश्वचषकामधील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केले तसेच अंतिम सामन्यातही करावे व पहिला वाहिला विश्वचषक जिंकावा.