मिताली राजचा क्रिकेटमध्ये ‘राज’, असा विक्रम जो आजपर्यंत कुणालाही जमला नाही

किमबर्ली। भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध दुसरा वनडे सामना जिंकला आणि कर्णधार मिताली राजच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. भारताने या सामन्यात १७८ धावांनी विजय मिळवला.

वनडेमध्ये कोणत्याही खेळाडूंपेक्षा सर्वाधिक वेळा मितालीने विजयी संघातून खेळण्याचा विक्रम केला आहे. भारताने मिळवलेल्या विजयांमध्ये १०९ वनडे सामन्यात मितालीचा सहभाग होता. याआधी हा विक्रम कारेन रॉल्टन या ऑस्ट्रलियाच्या खेळाडूच्या नावावर होता. ती वनडेत १०८ वेळा विजयी संघातून खेळली आहे. तिच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचीच अॅलेक्स ब्लकवेल(१०७) आणि इंग्लंडची शार्लोट एडवर्ड(१०३) या आहेत.

मितालीने भारताकडून खेळताना आत्तापर्यंत १८८ वनडे सामने खेळले असून ५१.२७ च्या सरासरीने ६२५५ धावा केल्या आहेत. याबरोबरच ती वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाजही ठरली आहे.

तसेच गेले १४ वर्षे ती भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तिने २००४ ला कर्णधारपद स्वीकारले होते. तिने आत्तापर्यंत १११ वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केले असून तिच्या नेतृत्वाखाली भारताने दोनदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण दोन्हीवेळी अंतिम सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.