मी कदाचित २०२१ चा विश्वचषक खेळेल- मिताली राज

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने आपण जर फिट असू आणि आपला फॉर्म चांगला असेल तर २०२१ विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

यावर्षी झालेल्या महिला विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली होती. मात्र त्यांना या सामन्यात विजय मिळवता आला नाही. परंतु, या स्पर्धेतील यशामुळे भारतीय महिला क्रिकेटला चालना मिळाली.

या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावेळी मिताली राजने हा आपला शेवटचा विश्वचषक असल्याचे सांगितले होते. परंतु आता तिने २०२१ चा विश्वचषक खेळण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे.

ती म्हणाली “मी सध्या पुढच्या विश्वचषकाबद्दल काही सांगू शकत नाही पण मला पुढच्या तीन वर्षात कळेल की चौथ्या वर्षी (२०२१) होणाऱ्या विश्वचषकात खेळावे की नाही.”

“त्यावेळी (२०२१) माझा फॉर्म कसा असेल हे सुद्धा महत्वाचे असणार आहे. त्यामुळे मी सध्या टी २० विश्वचषक आणि २०१८ मध्ये असणाऱ्या सामन्यांकडे लक्ष देतीये.”

विश्वचषक स्पर्धेनंतर महिला खेळाडू अजून क्रिकेट खेळल्या नाहीत. त्यांच्या विश्वचषक स्पर्धेतील यशामुळे त्याचा सन्मान वेगवेगळ्या स्थरावर होत आहे. यावर ती म्हणाली की “आत्तापर्यंत आम्ही खरंच खूप व्यस्त होतो पण  खूप छान वाटतंय की सगळे कौतुक करतायेत आणि पुरुष संघाच्या बरोबरीने वागवत आहेत. २००५ च्या वेळी अशी परिस्थिती नव्हती.”

पुढे ती म्हणाली “देशांतर्गत स्पर्धेचा मोसम डिसेंबरमध्ये सुरु होणार आहे. ती दक्षिण आफ्रिका दौर्यासाठीची तयारी असेल आणि तेव्हा तीन महिन्यांच्या विश्रांती नंतर पुन्हा क्रिकेटकडे खेळाडू वळतील.”

मिताली राज ने भारत अ संघाबाबतही भाष्य केले. ती म्हणाली “भारत अ संघाच्या दौऱ्यामधून जे खेळाडू भारतीय संघात येतील तेव्हा भारत अ संघात जागा असतील त्यामुळे युवा महिला खेळाडूंना संधी तसेच अनुभवही मिळेल.”

“या सगळ्यामुळे जर भारतीय मुख्य संघातील एखादी खेळाडूला दुखापत जर झाली तर २०-२५ मुली असतील ज्या एकमेकांविरुद्ध लढतील आणि एक २०२१ च्या विश्वचषकासाठी एक मजबूत संघ तयार होईल”

भारतीय महिला संघ फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे.