८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन

पुणे : मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियातर्फे ८ व्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ आणि १२ आॅगस्ट २०१७ दरम्यान बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा होणार आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये स्पेन येथे होणाºया जागतिक बायथले आणि ट्रायथले स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड या स्पर्धेतून होणार आहे, अशी माहिती मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पुर्णपात्रे यांनी दिली.

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक ११ आॅगस्ट रोजी होणार आहे. यावेळी मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव नामदेव शिरगावकर, प्रशिक्षक जितेंद्र खासनीस उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत धावणे आणि जलतरण या स्पर्धा होणार आहे. ८ वर्षांखालील ते ६० वर्षांवरील खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत.

सुनील पुर्णपात्रे म्हणाले, स्पर्धेतील ८ वर्षांखालील गटात २०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि २०० मीटर धावणे, १३ वर्षांखालील गटात ४०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि ४०० मीटर धावणे, १५ वर्षांखालील गटात ८०० मीटर धावणे, १०० मीटर पोहणे आणि ८०० मीटर धावणे, १७ वर्षांखालील गटात १२०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे, आणि १२०० मीटर धावणे, १९, २१ व ३९ वर्षांखालील गटात १६०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे आणि १६०० मीटर धावणे , मास्टर्स गटात (४० ते ५० वर्षांखालील) १२०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे आणि १२०० मीटर धावणे, ६० वर्षांखालील गटात ८०० मीटर धावणे,१०० मीटर पोहणे आणि ८०० मीटर धावणे तसेच अपंग गटात २०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि २०० मीटर धावणे अशा स्पर्धा होणार आहेत.

जितेंद्र खासनीस म्हणाले, स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक स्पर्धकाला पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. मागील ७ वर्षे महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. वेदांत गोखले, सवर अकुसकर, अर्जुन अडकर हे मागील वर्षीच्या जागतिक स्पर्धेतील विजेते स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सौरभ पाटील, विराज परदेशी, अजिंक्य बालवडकर, प्रसाद भार्गव, पार्थ खराटे, जुई घम, आदिती पाटील या खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळेल.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक १२ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. यावेळी बाळासाहेब लांडगे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, एशियन मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशनचे सचिव नामदेव शिरगावकर, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे उपस्थित राहणार आहेत.