विराटकडून कौतुकाचे शब्द ऐकून मोहम्मद आमीर गेला भारावून !

भारताचा कर्णधार विराट कोहली याने मागील आठवड्यात एका चॅट शोमध्ये बॉलीवूड अभिनेता आमीर खान बरोबर बोलताना असे वक्तव्य केले की पाकिस्तानचा मोहम्मद आमीर हा आता जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. विराट पुढे असेही म्हणाला की त्याच्या नऊ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वात कठीण गोलंदाज आमीरच आहे.

यावर महंमद आमीर म्हणाला, “हा विराटचा मोठेपणा आहे. त्याने माझ्या गोलंदाजीचे केलेले कौतुक ऐकून मी खरंच भारावून गेलो आहे. या आधीही विराटने कोलकातामध्ये जेव्हा मला त्याची बॅट भेट म्हणून दिली होती तेव्हा तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता.”

या आधीच आमिरने ट्विटरवर एका ट्विटला रिप्लाय करताना असे सांगितले आहे की विराट हा आता जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.

आमीर म्हणतो ,”संपूर्ण जगाला माहित आहे की विराट कोहली हा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना तुम्हाला सर्वस्व पणाला लावायला लागते. तुम्ही जर त्याला खेळपट्टीवर टिकण्याची संधी दिली तर तो सामना एकहाती जिंकू शकतो आणि हे त्याने ढाकामधील आशिया कप सेमी फायनलमध्ये दाखवून दिले. “

“मला जर त्याची विकेट घ्यायची असेल तर मला माझ्या गोलंदाजीत अजून लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. विराट कोहली हा धावांचा पाठलाग करताना सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे आणि हे त्याच्या आकड्यांवरून दिसून येते त्याची सरासरी सर्वाधिक आहे आणि स्ट्राईक रेटही उत्तम आहे त्यामुळे जर मला उत्तम गोलंदाज बनायचे असेल तर मी विराट कोहलीसमोर चांगली गोलंदाजी करणे गरजेचे आहे.”