पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजला मोठा झटका

पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हाफिज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गोलंदाजी करताना आयसीसीच्या गोलंदाजीच्या नियमांचे उल्लंघनकेल्यामुळे त्याला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या करण्यापासून बंदी घातली आहे.

मागच्या महिन्यात अबुधाबी येथे चालू असलेल्या पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातल्या ३ वनडे सामन्यात त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्याच्या चाचणीनंतर आता त्याला गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे. या चाचणीत असे निदर्शनास आले की हाफीजचे बहुतेक बॉल हे आयसीसीच्या १५ अंश मर्यादेच्या पलीकडे जात होते.

हाफीजवर बंदी घालण्यात येणारी ही पहिली वेळ नसून तीन वर्षात तिसरी वेळ आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये पाकिस्तान न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या अशी बंदी घालण्यात आली होती. एप्रिल २०१५ मध्ये हाफीजने आपली शैली काहीशी सुधारली व आयसीसीच्या नियमावलीत बसला.

मात्र काही महिन्यात परत गॉलच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला परत बंदीला सामोरे जावे लागले. यावेळी बंदी संपूर्ण १ वर्षांची होती, कारण २४ महिन्यात एखाद्या खेळाडूवर आयसीसीने बंदी घातली तर त्याला १२ महिने दंडाला सामोरे जावे लागते.