क्रिकेटर मोहम्मद आमिरला ‘कन्यारत्न’

पाकिस्तानचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद आमिरला आज कन्यारत्न झाले आहे. याची घोषणा स्वतः आमिरने फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.

आमिरसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे. कारण आजच्या दिवशीच पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतत आहे. आज पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड ११ या संघात लाहोर येथे पहिला टी२० सामना होत आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने सोमवारीच या मालिकेत मोहम्मद अमीर खेळणार नसल्याची घोषणा केली. त्याच्या जागी सोहेल खान या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

मोहम्मद आमिरने आजपर्यंत कधीही पाकिस्तान देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं नाही. त्याने २००९ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. सध्या हा खेळाडू इंग्लंड देशात रहात असून तेथे काउंटी क्रिकेट खेळत आहे.

पाकिस्तानमध्ये आज होणाऱ्या टी२० सामन्यात वर्ल्ड ११ चे नेतृत्व फाफ डुप्लेसी करत आहे. या मालिकेतील दुसरा सामना १३ सप्टेंबर आणि शेवटचा सामना १५ सप्टेंबर रोजी आहे.